दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
बातम्या
जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात ३५ टक्के घट
कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. कमी पाण्यामुळे द्राक्षे लवकर शेडवर टाकावी लागली. याचा परिणाम बेदाणा उत्पादनावर झाला. शासनाने द्राक्षबागेवरील कर्ज माफ करावे.
- विलास शिंदे, बेदाणा उत्पादक शेतकरी संख, ता. जत.
पाण्याअभावी बेदाण्याचा दर्जा चांगला मिळाला नाही. त्यामुळे बेदाण्याला दर कमी मिळतील. याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
- विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत
सांगली : पावसाळ्यात पावसाची दडी, परतीच्या पावसाचा अभाव, यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई सुरवातीपासून सुरू आहे. शेततलाव, कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर बागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून बागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. पूर्व भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठा करून बागा आणल्या आहेत. मात्र, पाण्याअभावी बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे ३५ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली.
जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. वर्षभरात ४८.३ मिलिमीटर पाऊस झाला. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी द्राक्ष जातीच्या बागा आहेत. पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षाचे उत्पादन घेण्यात आले.
अनुकूल हवामानामुळे या वर्षी द्राक्षवेलींना चांगले घड सुटले. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. पण पाण्याच्या कमतरतेमुळे कांड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या. पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून बागेला पाणी कमी पडले. त्यामुळे फळे मोठी होण्यासाठी, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड व मणी लहान तयार झाले. द्राक्षात साखर पाहिजे त्या प्रमाणात तयार झाली नाही.
पूर्व भागात विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी अाहे. त्यामुळे दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जाते. उमदी, बिळूर, सिद्धनाथ, तिकोंडी, भिवर्गी, अंकलगी, जालिहाळ खुर्द, मुचंडी, डफळापूर, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, कोंत्येवबोबलाद, हळ्ळी, बेळोंडगी, करजगी, दरीबडची, संख, उमदी, माडग्याळ, सोन्याळ, उटगी, सिद्धनाथ परिसरात पाऊस कमी झाला.
द्राक्षबागायतदारांनी एकरी तीन लाख केवळ पाण्यासाठी खर्च केला. पाणी उपलब्ध न झाल्यास भविष्यात जत पूर्व भागातील द्राक्ष बागा नष्ट होतील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.