राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढाल

राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढाल
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढाल

मुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी उच्चांकी उलाढाल करणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बँकेच्या नावातील बदलासह भागधारकांना सलग सहाव्यांदा दहा टक्के लाभांश देण्याच्या निर्णयाला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली.  या वेळी २०१८–१९ या आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी वार्षिक सभेपुढे मांडला. ते म्हणाले, की बँकेस गेल्या वर्षीप्रमाणे ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे. अहवाल वर्षात इतिहासात बँकेने प्रथमच एकूण ३५,४४० कोटी इतकी उच्चांकी उलाढाल केली आहे. तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण राखणे आवश्यक असताना, राज्य बँकेने मार्च २०१९ अखेर १५.६० टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे.  अहवाल वर्षअखेर बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) २६८२ कोटी इतके असून, बँकेचा स्वनिधी ४०३१ कोटी झाला आहे. अहवाल वर्षात बँकेला ५६४ कोटींचा ढोबळ नफा, तर तरतुदीनंतर २५१ कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. २०१८ -१९ या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे सर्व सभासदांना सलग सहाव्यांदा १० टक्के इतका लाभांश जाहीर केला. राज्य बँकेने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व स्वीकारले आहे. राज्याची ही शिखर बँक असूनही, ‘शिखर’ या शब्दाचा समावेश नव्हता. त्यामुळे उपविधीमध्ये बदल सुचवून बँकेचे नाव दि महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँक लि., म्हणजेच दि महाराष्ट्र राज्य सहकारी ‘शिखर’ बँक लि., करण्याच्या शिफारशीस सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभासद व व्यवस्थापन यांचेमध्ये काही कलह निर्माण झाल्यास, त्यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यापूर्वी बँक व कर्जदार यामध्ये तडजोडीचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने राज्य बँकेने ‘तडजोड मंडळाची निर्मिती’ करण्याच्या शिफारशींना एकमताने मंजुरी दिली. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, वैधानिक लेखापरीक्षक डी. ए. चौगुले अॅण्ड असोसिएट्‍स यांचे प्रतिनिधी तसेच बँकेचे सभासद प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com