जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडून राखीव
राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल सोयाबीन बियाणे विकत घेतात. मात्र पुढील हंगामाकरिता आतापासूनच शेतकऱ्यांनी ‘घरचे’ बियाणे म्हणून ३६ लाख क्विंटल माल राखीव ठेवला आहे.
पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल सोयाबीन बियाणे विकत घेतात. मात्र पुढील हंगामाकरिता आतापासूनच शेतकऱ्यांनी ‘घरचे’ बियाणे म्हणून ३६ लाख क्विंटल माल राखीव ठेवला आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन बियाण्याच्या समस्येवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जिल्हानिहाय पाठपुरावा सुरू होता. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा उत्पादित केलेले सोयाबीन लगेचच बाजारात ‘धान्य’ म्हणून विकू नये. त्याऐवजी बीज परीक्षण करून हेच धान्य घरामध्येच ‘बियाणे’ म्हणून राखीव ठेवावे, असा प्रचार कृषी खात्याने अनेक गावांमध्ये केला.
शेतकऱ्यांना बाजारातून सरासरी ६० रुपये किलोने म्हणजेच सहा हजार रुपये क्विंटलने बियाणे घ्यावे लागते. एकरी ३० किलो म्हणजेच १८०० रुपयांचे बियाणे शेतकरी विकत घेतात. काही कंपन्या हेच बियाणे २ ते ३ हजार रुपये क्विंटलने विकतात. “बाजारातून किमान ६०० कोटी रुपयांचे बियाणे शेतकरी विकत घेतात. कृषी विभागाच्या जागृतीमुळे शेतकऱ्यांचे ४०० ते ५०० कोटी रुपये यंदा वाचतील,” असा दावा कृषी खात्याचा आहे.
‘‘घरचे बियाणे वापरण्यासाठी गावपातळीवर मोहीम राबविली गेली. कृषी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत २५ जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या तपशिलानुसार तीन लाख शेतकऱ्यांनी बियाणे राखीव ठेवले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या दोन लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील किमान ३६ लाख क्विंटल बियाणे ‘स्टॉक’ केले आहे,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
कृषी सचिव व कृषी आयुक्तांकडून सोयाबीन बियाणे स्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. ‘‘शेतकरी ३० लाख क्विंटल बियाणे वापरतात. त्यापैकी १० लाख क्विंटल बियाणे बाजारातून विकत घेतात. शेतकऱ्यांनी ‘आत्मनिर्भर’ होत सर्व बियाणे स्वतःकडील वापरावे, असा प्रयत्न कृषी खात्याचा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या ताब्यात ३६ लाख क्विंटलचा स्टॉक असून, त्यापैकी ‘धान्य’ म्हणून ५-६ लाख क्विंटल बियाणे विकले जाऊ शकते. मात्र त्यानंतरही किमान ३० लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडेच राहील,’’ असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.
कृषी संचालक दिलीप झेंडे म्हणाले, की ‘‘कंपन्यांच्या दर्जेदार बियाण्यांवर शेतकऱ्यांचा विश्वास असतो. असे शेतकरी घरचे आणि कंपन्यांचे असे दोन्ही बियाणे हमखास वापरतात. मात्र दर्जेदार ‘बियाणे योग्य’ सोयाबीन पिकवून देखील काही शेतकरी तोच माल गरजेपोटी ‘धान्य’ म्हणून विकतात. त्यानंतर पेरणीच्या वेळी पुन्हा बियाण्यांसाठी वणवण फिरतात. अशावेळी घाईघाईने कमी दर्जाचे बियाणे विकत घेतात. अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत. त्यात बीजोत्पादक शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे पुढील खरिपात शेतकऱ्यांचा सोयाबीन बियाण्यावर खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.’’
अशी असते सोयाबीन बियाण्याची स्थिती
- राज्याचे सोयाबीनखालील सरासरी लागवड क्षेत्र ः ३८.८४ लाख हेक्टर
- गेल्या हंगामात झालेला पेरा ः ४३.५६ लाख हेक्टर
- राज्यातील शेतकऱ्यांना किती बियाणे लागते ः ३० लाख क्विंटल
- शेतकरी घरचे बियाणे किती वापरतात ः १८ ते २० लाख क्विंटल
- महाबीज व एनएससीचे बियाणे किती विकले जाते ः अंदाजे पाच लाख क्विंटल
- खासगी बियाणे कंपन्या किती बियाणे विकतात ः ५ ते ७ लाख क्विंटल
प्रतिक्रिया
राज्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता घरचे बियाणे जपून ठेवावे. त्याचा वापर पुढील हंगामासाठी करावा. यामुळे बाजारातील गैरप्रकाराचे प्रमाण घटेल, तसेच दर्जेदार बियाणे कंपन्यांना व्यवसायाच्या जास्त संधी तयार होतील.
- दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग
- 1 of 653
- ››