राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठा

मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली मात्र जुलै महिन्यात धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याच नाहीत.
dam
dam

पुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली मात्र जुलै महिन्यात धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याच नाहीत. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांत अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ५५२ टीएमसी (३८ टक्के) पाणीसाठा झाला असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.    विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा जून महिन्यातच राज्यातील सर्वच विभागांमध्ये पाणीसाठा वाढू लागला. तर जुलै महिन्यात धरणांच्या पाणलोटात पावसाने ओढ दिली आहे. सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा मुबलक पाऊस झाला आहे. मराठवाड्यात यंदा ३६ टक्के, पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात ३५ टक्के, पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागात ५० टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात सुमारे ३५ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभाग विभागात ३५ टक्के आणि कोकण विभागात ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाले असल्याचे अहवालावरून दिसून येते.  घाटमाथ्यावरील मुख्य धरणांच्या क्षेत्रात पावसाने दडी मरूनही मराठवाडा, वऱ्हाड, खानदेशातील पावसामुळे राज्याचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे राज्यात यंदा गतवर्षी एवढाच पाणीसाठा झाल्याचे दिसून येते. मात्र पुणे आणि नाशिक विभागातील धरण जोरदार पावसाची आवश्यकता आहे. मॉन्सूनचा निम्मा हंगाम संपल्याने उर्वरित दोन महिन्यांच्या कालावधीत नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.   मराठवाड्यात पाणीच पाणी  सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्याने पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे. गतवर्षी अवघे ०.९८ टीएमसी पाणी असलेल्या मराठवाड्यातील ९६४ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ९३.७९ टीएमसी (३६ टक्के) पाणीसाठा आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ६७.७८ टीएमसी (४८ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ९.०२ टीएमसी (२४ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ७.९९ टीएमसी (१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील मांजरा (बीड), सिना कोळेगाव (उस्मानाबाद) ही धरणे वगळता सर्वच धरणांमध्ये चल पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात ३७.२३ टीएमसी (४९ टक्के) चल पाणीसाठा आहे. धरणातील अचल पाणीसाठा विचारात घेता ६३.२८ टीएमसी पाणीसाठा आहे.  पुणे विभागातील धरणे रिकामीच राज्यातील सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प असणाऱ्या पुणे विभागातील धरणे यंदा रिकामीच आहेत. विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यामधील प्रमुख धरणांमध्ये सध्या १८७.१० टीएमसी (३५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १४ टक्के पाणीसाठा कमी आहे. उजनी धरण चल पातळीत आले असून, धरणात ५.६८ टीएमसी (११) टक्के चल पाणीसाठा आहे. अचल पातळीचा विचार करता धरणात ६९.३३ टीएमसी (५९ टक्के) पाणी आहे. तर कोयना धरणाच्या चल आणि अचल पातळीत मिळून ५१.७९ टीएमसी (५१ टक्के) पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १६१.३५ टीएमसी (३७ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १९.३६ टीएमसी (४० टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये ६.३८ टीएमसी (१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील गतवर्षी इतकाच पाणीसाठा नाशिक विभागातील धुळे, जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने लहान मोठे जलाशय भरले आहेत. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटात जुलै महिन्यात   पावसाचा जोर कमी असल्याचे चित्र आहे. या धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. जून महिन्यात झालेला पावसाने पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाल्याने यंदा नाशिक विभागातील धरणात गतवर्षी येवढेच पाणी जमा झाले आहे. विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ७४.१२ टीएमसी (३५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी विभागात सुमारे ३३ टक्के पाणीसाठा होता. यंदा मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ४९.०४ टीएमसी (३७ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १८.८९ टीएमसी (४५ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ६.१९ टीएमसी (१६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. कोकणात यंदा ३४ टक्के कमी पाणी  कोकण विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने कोकण विभागात यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३४ टक्के कमी पाणीसाठा आहे. सर्व प्रमुख धरणांमध्ये ६३.०९ टीएमसी (५० टक्के) पाणी जमा झाले असून, गतवर्षीही या धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा होता. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४०.८२ टीएमसी (४७ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ११.६१ टीएमसी (६८ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात १०.६६ टीएमसी (५४ टक्के) पाणीसाठा आहे.  पूर्व विदर्भात पाणीसाठा निम्यावर पूर्व विदर्भात यंदा चांगला पाणीसाठा असून, नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये मिळून ८१.३६ टीएमसी (५० टक्के) पाणीसाठा झाला आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्यास प्रमुख धरणे लवकरच ‘ओव्हर फ्लो’ होणार आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६८.०९ टीएमसी (४८ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ७.६७ टीएमसी (३४ टक्के) तर ३२६ लघू प्रकल्पात ५.६० टीएमसी (३१ टक्के) पाणीसाठा आहे. पश्चिम विदर्भात यंदा तिप्पट पाणी पश्चिम विदर्भातील पावसाने दमदार हजेरी लावल्याने अमरावती विभागात ५२.५४ टीएमसी (३५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. बुलडाण्यातील खडकपुर्णा धरणातून जुलै महिन्यात विसर्ग करावा लागला आहे. यंदा अमरावती विभागात गतवर्षी तुलनेत जवळपास तिप्पट पाणी आहे. गतवर्षी सर्व प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा होता. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१.४४ टीएमसी (४७ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ७.६९ टीएमसी (३२ टक्के) तर ४११ लघू प्रकल्पात ३.४२ टीएमसी (५ टक्के) पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  राज्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांमधील जुलै अखेरपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी): 

विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४६ १४८.०४ ५२.५४ ३५
औरंगाबाद ९६४ २६०.२७ ९३.७९ ३६
कोकण १७६ १२३.९२ ६३.०९ ५०
नागपूर ३८४ १६२.६५ ८१.३६ ५०
नाशिक ५७१ २११.९६ ७४.१२ ३५
पुणे ७२६ ५३७.०३ १८७.१० ३५
एकूण ३२६७ १४४३.८८ ५५२.०० ३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com