कृषी विभागाने बदली प्रक्रियेतून ३८८ पदे वगळली

कृषी विभाग
कृषी विभाग

पुणे : राज्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना समुपदेशानातून चक्क ३८८ पदे अचानक वगळण्यात आली आहेत. यामुळे विभागात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.   समुपदेशनातून वगळलेली अनेक पदे मलईदार समजली जातात. बदल्यांचे नियोजन व प्रक्रिया आस्थापना विभागाने तयार केली आहे. ‘प्रशासकीय कारणास्तव समुपदेशातून पदे वगळण्याची तरतुद शासनाच्या मूळ धोरणात नाही. त्यामुळे आस्थापना विभागाने कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला,’ असा सवाल काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.  बदल्यांमध्ये सोनेरी टोळी घुसल्यामुळे मूळ धोरणाची मोडतोड करून बदल्यांची प्रक्रिया राबविली जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वगळलेली पदे कोणत्या पद्धतीने भरली जातात याकडे आता राज्याचे लक्ष लागून आहे.  समुपदेशन बदल्यांमध्ये गेल्या हंगामात तत्कालीन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी मोक्याची व मलईदार पदे ब्लॉक केली होती. या पदांवर कोणाचीही नियुक्ती होणार नव्हती. मात्र आयुक्तांनी यादी मंत्रालयात पाठविल्यानंतर सोनेरी टोळीने ‘नजराणा तंत्र’ वापरून काही ‘ब्लॉक’ केलेली पदे ‘ओपन’ करून हव्या तशा बदल्या करून घेतल्या होत्या. तथापि, अशी पदे कमी असल्यामुळे बदल्यांमधील गैरप्रकाराला बऱ्यापैकी चाप बसला होता. यंदा मात्र ३८८ पदे वगळल्याने घोडेबाजार अटळ असल्याचे सांगण्यात येते.  ''महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यािचे बदल्याचें विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्यास विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५'' असा कायदा राज्यात लागू आहे. त्याअंतर्गत बदल्यांचे नवे धोरण जाहीर करून बदल्या समुपदेशनाने होतील, असे शासनाने स्पष्ट केले. समुपदेशनात कोणाताही कृषी अधिकारी त्याला बदलीने हव्या असलेल्या दहा पदांचे पर्याय सांगतो.  ‘समुपदेशनाच्या धोरणानुसार एप्रिलमध्येच कर्मचाऱ्यांना रिक्त पदांची माहिती देण्याची गरज होती. ही माहिती संकेतस्थळावर व सर्व कार्यालयांमध्ये जाहीर करण्याची गरज होती. तसेच, प्रशासकीय कारणास्तव पदे वगळण्याची तरतूद या धोरणात नाही. तरीही पदे वगळली असल्यास त्याचे सबळ कारण तसेच हे पदे भविष्यात कसे भरले जाणार याची माहिती देण्याची आवश्यकता होती,’ असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  बदल्या समप्रमाणात होणे अवघड  बदल्या करताना तीन वर्ष एका पदावर काम केलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३० टक्के बदल्या करायच्या आहेत. त्यात पुन्हा सर्व विभागात सर्व कार्यालयात समप्रमाणात बदल्या करायच्या आहेत. शेकडो पदे प्रशासकीय कारणास्तव बाजूला ठेवल्याने समप्रमाणात बदल्या अवघड आहे. त्यामुळे समप्रमाण कसे राखले जाईल तसेच भविष्यात ही पदे नेमकी कोणत्या प्रक्रियेने होतील हेदेखील आस्थापना विभागाने जाहीर केले नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com