अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्त

आमच्या गावात सर्व पशुपालक मक्याचाच चारा जनावरांना देत आहेत. चाराटंचाईमुळे इतर चारा शिल्लक नाही. गेल्या आठवड्यात दोन जनावरे गावात दगावली. मात्र, त्याचे कारण कळलेले नाही. मी स्वतः मका चारा माझ्या जनावरांना देत असून सतत दोन-तीन दिवस चारा दिल्यास जनावरांच्या पोटात बिघाड होत असल्याचे माझे निरीक्षण आहे. - गणेश जोशी, शेतकरी,गेवराई बाजार, बदनापूर (जि. जालना)
लष्करी अळी
लष्करी अळी

पुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे प्रचंड आक्रमण झाल्याने बहुतांश भागात ४०; तर काही ठिकाणी १०० टक्के पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाच ते १० हजार कोटींच्या पुढे मका उत्पादकांचे थेट नुकसान होण्याची शक्यता असून, या अभूतपूर्व नुकसानाची नोंद अद्यापही शासकीय पातळीवर घेतली न गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पाश्‍‍र्वभूमीवर पीक पंचनामे किंवा पीकविम्याबाबत आता शासन काय भूमिका घेणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेनुसार मका उत्पादनात किमान ४० टक्के नुकसानपातळीवर एकरी ६ ते १२ क्विंटल थेट नुकसान होणार आहे. हमीभाव १७६० रुपये प्रतिक्विंटलनुसार हे नुकसान एकरी १० हजार ते २१ हजार रुपयांपर्यंत होणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादकतेनुसार १० हजार कोटींच्या पुढे; तर शासकीय उत्पादकता लक्षात घेता नुकसान पाच हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून कापसावरील गुलाबी बोंड अळीने त्रस्त शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनपेक्षाही अधिक मक्याला पसंती दिली. परिणामी यंदा मक्याची विक्रमी लागवड झाली. २०१२ ते २०१७ या कालावधीत मक्याचा एकूण पेरा विचारात घेता सरासरी दरवर्षी राज्यात सात लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर मका घेतला जातो. मागील वर्षी शेतकऱ्यांनी आठ लाख २९ हजार हेक्टरवर मका पेरला. यंदा मात्र थेट आठ लाख ६० हजार हेक्टरवर मका पेरला गेला आहे. सरासरी क्षेत्राच्या ११७ टक्के मका पेरला गेला आहे. मात्र, लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात पीक फस्त केले. अळीमुळे किती मका सुरक्षित आहे, याविषयी कृषी विभागाने काहीही अंदाज दिलेला नाही. ४० ते १०० टक्क्यांपर्यंत पीक वाया खरीप मक्याला कमी पाऊस व किडीमुळे बसलेल्या तडाख्यामुळे राज्यात मक्याचे किमान ४० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जातो. काही गावांमध्ये ४० टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत पिकाची हानी झालेली आहे. २०१८-१९ मधील खरीप मका हंगामाचा आढावा घेतल्यास राज्यात आठ लाख १६ हजार हेक्टरवर मका पेरला गेला. त्यातून १६ लाख ८८ हजार टन उत्पादन घेतले गेले. उत्पादकता हेक्टरी दोन हजार ६९ किलो मिळाली होती. कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मक्याची अगदी २० टक्के हानी गृहीत धरली तरी किमान तीन लाख टनाच्यावर उत्पादन वाया गेले आहे. यंदा मक्याला जाहीर झालेला किमान हमी भाव प्रतिक्विंटल एक हजार ७६० रुपये आहे. हाच दर वाया गेलेल्या उत्पादनाला लावला तरी पाच हजार २८० कोटीची हानी झाली आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. मात्र, कृषी विभागाने पीकपंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीत. तसेच, पीकविम्या कंपन्यानाही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. गाफिल राहिल्याने झाली हानी राज्यातील मका उत्पादक भागात यंदा लष्करी अळीचा प्रकोप होण्याची शक्यता आधीपासून वर्तविली जात होती. मात्र, कृषी विभागाने ‘अमेरिकन लष्कळी अळीचा प्रादुर्भाव यंदा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपआपल्या जबाबदारीवर मका लावावा,’ अशी घोषणा केली. कमी पाऊस व गुलाबी बोंड अळीमुळे यंदा अनेक भागांत कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले होते. त्यांनी ऊस व कपाशीखालील क्षेत्र मक्याखाली आणले. दुसऱ्या बाजूला कृषी विभाग गाफिल राहिल्याने मक्याची हानी मोठ्या प्रमाणात झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात कपाशी, सोयाबीन, तूर आणि मका हे शेतकऱ्यांचे नगदी पीक बनले आहे. यंदा औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, बीड, सातारा, सांगली अशा सर्व भागात मका लागवड असून सर्वत्र अळीचा प्रादुर्भाव आहे.  मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकरी सरासरी २५-३० क्विंटल मका उत्पादक घेणाऱ्या भागात यंदा एकरी अवघा ५ ते ६ क्विंटल माल हाती येण्याची शक्यता आहे. वेळेत पाऊस न झाल्यामुळे तसेच अळीचा मोठा उद्रेक असल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता मका उत्पादकांना वाटते. राज्यात मका पिकाचा कालावधी १२० ते १३५ दिवसांचा आहे. कीड येण्यासाठी अत्यंत जोखमीचा कालावधी ४५ दिवसांचा होता. आता मात्र राज्यात मका पीक ७० ते ८० दिवसांच्या वर गेले आहे. कृषी विभागाकडून अहवालच नाही राज्यात मका पिकावर कोणत्या भागात किती कीड पसरलेली आहे, याबाबत कृषी विभागाने अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. यापूर्वी कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाकडून दर आठवड्याला पीकपेऱ्याची स्थिती सांगणारा अहवाल प्रसिद्ध केला जात होता. यंदा त्यात खंड पडला असून याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. सहा सप्टेंबरला कृषी विभागाने जाहीर केलेल्या अहवालात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. मात्र, ही गावे किती याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर अशा सर्व विभागांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. तथापि, यात गावांची आणि क्षेत्राची संख्या देण्यात आलेली नाही. प्रतिक्रिया यंदा आम्ही गुलाबी बोंड अळीपेक्षाही जास्त लक्ष ''अमेरिकन फॉल आर्मी वर्म''वर ठेवले होते. मात्र, वेळीच जनजागृती आणि पावसामुळे किडींचे नैसर्गिक नियंत्रण या दोन्ही बाबी प्रभावी ठरल्या. कीड पूर्णतः नियंत्रणात आहे. ''अमेरिकन फॉल आर्मी वर्म'' नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी केलेला मका पुढे चारा म्हणून सेवन केल्याने जनावरांचा मृत्यू झाला, अशीदेखील माहिती कुठूनही आलेली नाही. - विजयकुमार घावटे, गुण नियंत्रण संचालक, कृषी विभाग, पुणे. यंदा तीन फवारण्या करूही पावनेतीन एकरातील मका लष्‌करी अळीमुळं संपली. खर्च करून बसलो, पिक ही गेलं. आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‌न उभा आहे. झालेल्या नुकसानीची कुणीही पाहणी केली नाही.  - भगवान नामदेव वाघ, शेकटा, जि. औरंगाबाद.  लष्करी अळीमुळे मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक कणीस हे अळीने पोखरले. या वर्षी उत्पादन ३० ते ४० टक्क्यांवर घसरण्याची शक्यता आहे. तीन वेळा फवारणी करूनही अळी पूर्णतः नियंत्रणात आली नाही. - विजय किलबिले,  मका उत्पादक, बुलडाणा अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. हा मुद्दा शासनाने गांभीर्याने हाताळायला हवा. -  डॉ. नितीन मार्कंडेय, प्राचार्य, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com