आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
बातम्या
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्त
मक्यावर लष्करी अळी सुरवातीलादेखील होती. तिचा जीवनक्रम मोडीत निघालेला नाही. क्रॉपसॅपच्या सर्वेक्षणानुसार ही अळी अनेक भागांत आहे. नुकसानीची पातळी ४० टक्क्यांपर्यंत आहे. ती आता कणसात असल्याने फवारण्या किंवा इतर उपाय करणे शक्य होत नसल्याची स्थिती आहे.
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव
जळगाव ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप कायम असून, कणसे पोखरून त्याची आतोनात हानी सुरूच आहे. मध्यंतरी आटोक्यात आलेली अळी पुन्हा सक्रिय झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुमारे ४० टक्के नुकसान या अळीमुळे झाले असून, यास जळगाव येथील कृषी विभागाने दुजोरा दिला आहे.
सुरवातीला जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, चोपडा, पाचोरा, भडगाव, जामनेर, रावेर, यावल, जळगाव, भुसावळात, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नवापूर व नंदुरबारात ही लष्करी अळी दिसून आली होती. जुलै महिन्यात अळीच्या नियंत्रणासंबंधी कृषी विभाग व जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने खासगी कंपन्या, कीडनाशक उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या मदतीने जनजागृती सुरू केली. अनेक भागांत पिकात कामगंध सापळे लावले. चोपडा, जळगाव, रावेर, यावल, भुसावळ व जामनेर भागांत अळी बऱ्यापैकी नियंत्रणात आली.
जुलैच्या अखेरीस व ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने पिकाची वाढही चांगली झाली. पीक निसवल्यांतर कणसे भरत आली. दाणे पक्व होतानाच ही अळी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर, पारोळा, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री या भागांत दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात ७५ हजार व धुळे, नंदुरबारात मिळून सुमारे २१ हजार हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती.
जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर, धुळे व नंदुरबारमधील मिळून पाच हजार हेक्टर क्षेत्र लष्करी अळीमुळे बाधित झाले आहे. कणसांवर कशी फवारणी करायची? कारण पिकाची वाढ झाली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कणसे वरच्या भागातून पोखरायला सुरवात झाली आहे. एका कणसात तीन ते चार अळ्या दिसून येत आहेत. कोवळे दाणे अळ्या फस्त करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया
आमच्या भागात लष्करी अळी मका पिकात कणसे पोखरत आहे. कणसांवर दाणेच शिल्लक राहणार नाहीत, अशी स्थिती आहे. ५० टक्क्यांवर हे नुकसान जाईल. खासगी कंपन्या, शासकीय यंत्रणा यांच्याकडून वेळीच उपाययोजना झालेल्या नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द (जि. जळगाव)