सांगली जिल्ह्यात ४०० हेक्‍टर द्राक्षबागांचे नुकसान

सांगली जिल्ह्यात ४०० हेक्‍टर द्राक्षबागांचे नुकसान
सांगली जिल्ह्यात ४०० हेक्‍टर द्राक्षबागांचे नुकसान

सांगली ः गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ८२५ शेतकऱ्यांचे ४०० हेक्‍टरवरील द्राक्षबागांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. तासगाव तालुक्‍यातील सर्वाधिक १२२.५ हेक्‍टरचा समावेश आहे. द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे बुधवारी (ता. २८) पाठवण्यात आला आहे. द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेल्या आठवड्यात १८ ते २२ नोव्हेंबर कालावधीत अवकाळी पावसाने झोडपले होते. जिल्ह्यात १.२० लाख एकरावर द्राक्षबागा आहेत. पावसाचा द्राक्ष, केळी, भाजीपाला पिकांना फटका बसला होता. तासगाव, आटपाडी, खानापूर, पलूस, कवठेमहांकाळ, पलूस आणि मिरज तालुक्‍यातील फुलोऱ्यातील बागांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. पावसामुळे द्राक्षबागांवर डाऊनी, मणी व घडकुजीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांच्या घडामध्ये पावसाचे पाणी साचल्याने बागेतील घड कुजण्याचे प्रकार घडले होते. घडात पाणी साचून मणी गळून पडत आहेत. जिल्हा प्रशासनाने कृषी, महसूल विभागाला पंचानाम्याचे आदेश दिले होते. गावपातळीवर कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांच्या पथकांकडून पंचनामे करण्यात आले.

पंचनाम्याची माहिती देण्यास कृषीकडून टाळाटाळ करण्यात आली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबतचा आवाज उठवला जात आहे. परंतू कृषी विभागाकडून माहिती देण्यास विलंब झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्रशासनाने प्राथमिक अंदाजामध्ये २८५ हेक्‍टरवरील द्राक्षबागांचे नुकसान झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com