नवी मुंबईतून सव्वाचारशे टन आंबा निर्यात

आंब्याची निर्यात करताना विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. ती व्यवस्था नवी मुंबईतील प्रक्रिया केंद्रांमधून उपलब्ध आहे. जास्तीत जास्त निर्यातीतून बागायतदारांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. - भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन मंडळ
आंबा निर्यात
आंबा निर्यात

रत्नागिरी  : हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशांत मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात झाला आहे. त्यात हापूसला मागणी असून, आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर मिळाला आहे.  आंबा हंगाम मार्चपासून सुरू होतो. एप्रिल आणि मेमध्ये सर्वाधिक आवक होते; मात्र या वर्षी कोकणच्या हापूससह कर्नाटकी आंब्याच्या उत्पादनावर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च, एप्रिलमध्ये नवी मुंबईत दाखल होणाऱ्या पेट्यांची आवक निम्म्यावर होती. एप्रिलच्या अखेरीस ही परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असून महाराष्ट्र, कर्नाटकच्या मिळून लाखावर पेट्या नवी मुंबईत गेल्या. रत्नागिरी, देवगड हापूसला स्थानिक मार्केटमध्ये चांगला दर मिळत होता. उत्पादन कमी झाले तरीही निर्यातीला वेळेत सुरवात झाली.  आंब्याची सर्वाधिक निर्यात अमेरिका आणि युरोपियन देशात होते. आतापर्यंत अमेरिकेमध्ये १६५ टन तर ऑस्ट्रेलियात १८ टन आंबा गेला आहे. त्यात पन्नास टक्के हापूस असून, उर्वरित चाळीस टक्क्यांत अन्य प्रकारचे आंबे आहेत. या दोन्ही देशांत निर्यात करताना विकिरण प्रक्रिया अत्यावश्यक आहे. नवी मुंबईत ही व्यवस्था करून देण्यात आली आहे. रशिया व न्यूझीलंडमध्ये ५० टन आणि युरोपात २०० टन आंबा निर्यात झाला. तिकडे उष्णजल (हॉट ट्रीटमेंट) आणि बाष्पजल (व्हेपरी ट्रीटमेंट) प्रक्रियेचा उपयोग केला जातो. जेट संपाने वाहतूक दर वाढले जेट कंपनीच्या संपामुळे विमान वाहतुकीचे दर वधारले असून, त्याचा फटका आंबा निर्यातदारांना बसला आहे. निर्यातीकरिता किलोला १६० ते १८० रुपये दर आकारला जात होता. संपामुळे तो २१० ते २१५ रुपये आकरण्यास सुरवात झाली आहे. चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे.  दोन दिवसांत जपानवारी जपान, कोरियाला येत्या काही दिवसांत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. जपानचे निरीक्षक दोन दिवसांत नवी मुंबईत येणार असून, निर्यात केंद्रात पाहणी केल्यानंतर तिकडील निर्यात सुरू होणार आहे. जपानमध्ये उष्णजल प्रक्रिया करूनच आंबा पाठविण्यात येतो. त्यानंतर कोरियासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com