45 lakh quintals of paddy likely to be spoiled in East Vidarbha
45 lakh quintals of paddy likely to be spoiled in East Vidarbha

पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब होण्याची शक्यता

भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत गेल्या खरीप हंगामात एक कोटी क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र राइस मिलर्स असोसिएशनने धान भरडाईचे काम थांबविल्याने धानाची उचल होऊ शकली नाही.

गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत गेल्या खरीप हंगामात एक कोटी क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र राइस मिलर्स असोसिएशनने धान भरडाईचे काम थांबविल्याने धानाची उचल होऊ शकली नाही. परिणामी ४५ लाख क्विंटल धान उघड्यावर, तर उर्वरित गोदामात असून ते खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासकीय धान्य खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व राइस मिलर्स यांच्यामध्ये करार होऊन भरडाई होते. राइस मिलर्स भरडाई केलेला सी.एम.आर. तांदूळ शासनाकडे जमा करतात. मात्र यंदा धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची गुणवत्ता योग्य नसल्याचा आरोप आहे. भरडाईनंतर धानाचा उतारा कमी असून, तुकडा होण्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. त्यामुळे राइस  मिलर्सला प्रतिक्विंटल तीनशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्याच्या परिणामी पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांत राइस मिलर्संनी धानाची उचल करण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून थांबविले आहे.

राइस मिलर्सला प्रतिक्विंटल धानापासून ६७ किलो तांदूळ शासनाकडे जमा करावा लागतो. तर २५ टक्क्यांपर्यंत तुकडा स्वीकारला जातो. मात्र सध्या एक क्विंटल तांदूळ भरडाई केल्यानंतर त्यापासून ६३ किलो तांदूळ होत आहे. याचे प्रमाण ४५ टक्के आहे. शिवाय धानाची गुणवत्ता सुद्धा योग्य नसल्याने प्रतिक्विंटल मागे राइस मिलर्सला तीनशे रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होत असून भरडाई केलेला तांदूळ सुद्धा स्वीकारण्यास एफसीआय नकार देत आहे. त्यामुळे धानाची भरडाई पूर्णपणे ठप्प आहे.

धानाला अपग्रेड करा धान्याची गुणवत्ता योग्य नाही. परिणामी तांदळाचा उतारा कमी येत आहे. त्याची दखल घेत धानाला अपग्रेड करून प्रतिक्विंटल दोनशे रुपये राईस मिलर्सला देण्यात यावे. तांदळातील तुकड्याचे प्रमाण २५ टक्के वरून ४० करण्यात यावे, अशी मागणी राईस मिलर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com