राज्यातील धरणांमध्ये ४५ टक्के पाणीसाठा 

उन्हामुळे होरपळ वाढत असतानाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
dam
dam

पुणे : उन्हामुळे होरपळ वाढत असतानाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ६५३.९४ टीएमसी (४५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाण्याची मागणी वाढल्याने राज्यातील धरणे वेगाने रिकामी होणार असली तरी यंदा पाणी टंचाईची दाहकता कमी राहण्याची चिन्हे आहेत.  विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मे महिना उजाडूनही राज्यातील सर्वच विभागांमध्ये यंदा चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. यात गेले काही वर्ष सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा ३९ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात ४२ टक्के, पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागात ४९ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात सुमारे ४५ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभाग विभागात ४७ टक्के आणि कोकण विभागात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये २६ टक्के जास्त पाणीसाठा पाणी शिल्लक आहे. यंदा पावसाच्या तोंडावर अनेक धरणे उपयुक्त पाणी पातळीतच राहण्याची शक्यता आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन, गळती व इतर करणांमुळे धरणांतील पाणी कमी होणार असल्याने पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे. गतवर्षी मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती खुपच खालावली होती. मराठवाड्यात अवघे ५ टक्के, तर नागपूर विभागात १० टक्के, अमरावती विभागात २४ टक्के पाणी शिल्लक होते. तर कोकणात ४० टक्के, नाशिक विभागात १८ टक्के तर पुणे विभागातील धरणांमध्ये २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.  मराठवाड्यात यंदा चांगली स्थिती  सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मराठवाड्यातील मांजरा (बीड), सिना कोळेगाव (उस्मानाबाद) निम्नदुधना (परभणी) ही धरणे अचल पाणीसाठ्यात गेली आहेत. तर बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात ४१ टक्के, हिंगोलीतील येलदरी ७० टक्के, सिद्धेश्‍वर ५० टक्के, नांदेडच्या निम्न मनार धरणात ५५ टक्के, उस्मानाबादच्या निम्न तेरणा धरणात १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात ४२.१८ टीएमसी (५५ टक्के) चल पाणीसाठा आहे. धरणातील अचल पाणीसाठा विचारात घेता ६८.२४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ७५.२८ टीएमसी (४७ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये १२.०३ टीएमसी (३२ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये १४.०१ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.  पुणे विभागातील धरणात ४७ टक्के पाणी  पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख धरणांमध्ये यंदा २५३.५९ टीएमसी (४७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास २५ टक्के पाणीसाठा अधिक असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात तळाशी गलेल्या उजनी धरण यंदा अद्यापही चल पातळीत आहे. उपयुक्त (चल) पाणीपातळीत ५.९४ टीएमसी (११ टक्के) पाणीसाठा आहे. चल आणि अचल पातळीचा विचार करता धरणात उजनीत ६९.५९ टीएमसी पाणीसाठा आहे. तर कोयना धरणाच्या चल आणि अचल पातळीत मिळून ५२.६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २१२.६४ टीएमसी (४८ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २३.३९ टीएमसी (४९ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १७.१९ टीएमसी (३५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.  नाशिक विभागात समाधानकारक पाणी  नाशिक विभागातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणात ४५ टक्के, भंडारदरा ५२ टक्के, जळगावमधील वाघूर ८२ टक्के, हातूनर ४८ टक्के, नाशिकमधील गिरणा ४१ टक्के, दारणा ७५ टक्के, तर गंगापूर धरणात ४१ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ९४.५८ टीएमसी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी नाशिक विभागात अवघा सुमारे १८ टक्के पाणीसाठा होता. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ६४.३५ टीएमसी (४९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये २०.८३ टीएमसी (४९ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ९.३९ टीएमसी (२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.  कोकणात निम्मा पाणीसाठा  कोकण विभागातील धरणांचा यंदा गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये ६२.१६ टीएमसी (५० टक्के) पाणी शिल्लक आहे. यात पालघर जिल्ह्यातील कवडास बंधाऱ्यात ९३ टक्के, धामणी धरणात ४३ टक्के, ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर धरणात ८४ टक्के, भातसा ४६ टक्के तर निम्म चौंडे धरणात २० टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी धरणांत ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४४.५४ टीएमसी (५१ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ९.८४ टीएमसी (५७ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात ७.७८ टीएमसी (३९ टक्के) पाणी शिल्लक आहे.  पूर्व विदर्भात यंदा चांगला पाणीसाठा  गतवर्षी पाणीसाठ्याची स्थिती गंभीर असलेल्या पूर्व विदर्भात यंदा तब्बल ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ६९.८२ टीएमसी पाणीसाठा आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणात २० टक्के, चंद्रपूरमधील असोळामेंढा धरणात ८५ टक्के, गोंदियातील इटियाडोह धरणात ३२ टक्के, नागपूरच्या तोतलाडोह धरणात ८१ टक्के, कामठी खैरी धरणात ५८ टक्के, तसेच वर्धा जिल्ह्यातील निम्नवर्धा धरणात ६० टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६४.७७ टीएमसी (५३ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ८.२० टीएमसी (३७ टक्के) तर ३२६ लघू प्रकल्पात ६.८५ टीएमसी (३८ टक्के) पाणी शिल्लक आहे.  पश्चिम विदर्भात पाणीसाठा ४२ टक्क्यांवर  पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ६२.४७ टीएमसी (४२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अमरावती विभागात २४ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठ्याची स्थिती तुलनेने चांगली आहे. अकोल्यातील काटेपुर्ण धरणात ४७ टक्के, वाण धरणात ५० टक्के, अमरावती उर्धवर्धा धरणात ५३ टक्के, बुलडाण्यातील पेनटाकळी धरणात ४९, यवतमाळमधील इसापूर धरणात ४६ टक्के, विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१.६५ टीएमसी (४८ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये १२.९० टीएमसी (५४ टक्के) तर ४११ लघू प्रकल्पात ७.९१ टीएमसी (२२ टक्के) पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.  राज्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांमधील ३० एप्रिलपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी): 

विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी 
अमरावती ४४६ १४८.०४ ६२.४७ ४२
औरंगाबाद ९६४ २६०.२६ १०१.३३ ३९ 
कोकण १७६ १२३.९२ ६२.१६ ५० 
नागपूर ३८४ १६२.६५ ७९.८२ ४९ 
नाशिक ५७१ २११.९७ ९४.५८ ४५
पुणे ७२६ ५३७.०३ २५३.५९ ४७ 
एकूण ३२६७ १४४३.८८ ६५३.९४ ४५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com