सोलापुरातील शेतकऱ्यांचे ४७ लाख सरकार जमा

सोलापुरातील शेतकऱ्यांचे ४७ लाख सरकार जमा
सोलापुरातील शेतकऱ्यांचे ४७ लाख सरकार जमा

सोलापूर  : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेबाबत राष्ट्रीयीकृत  बॅंकांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. उलट या योजनेसाठी मिळालेले सुमारे ४७ लाख रुपये शासन जमा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक वगळता अन्य बॅँकांनी या योजनेबाबत कमालीची उदासीनता दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. विविध जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी तीन टक्‍क्‍यांचा, तर तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी एक टक्‍क्‍यांचा व्याज परतावा शेतकऱ्यांना शासनातर्फे दिला जातो.

या योजनेचा लाभ प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी बॅंकांचा पुढाकार आवश्‍यक आहे; पण केवळ वसुलीसाठी भुतासारख्या पाठीमागे लागणाऱ्या बॅंका या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मात्र फारशा उत्सुक दिसत नाहीत. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंका सर्वाधिक आघाडीवर आहेत. शेतकऱ्यांना कर्जे देताना, त्या आधीच नाके मुरडतात. त्यात अशा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा म्हटल्यास थेट जबाबदारी झटकतात. याचा अनुभव पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला.  

जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही  राष्ट्रीयीकृत बॅंकांची बेफिकिरी

जिल्हा बॅंकेने या योजनेसाठी आपल्या पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाला कळवली. तीही अगदी वेळेत; पण काही राष्ट्रीयीकृत बॅंका वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकांनी  शेतकरी या योजनेसाठी पात्र असतानाही, केवळ चालढकल करून ही यादी दिली नाही. त्यामुळे हे पैसे परत गेले. विशेष म्हणजे बॅंकांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वारंवार तंबी  देऊनही या बॅंकांनी त्यांच्या इशाऱ्याला महत्त्व दिले नाही.

जिल्हा बॅंकेकडून दिलासा 

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील ४९ हजार ८५७ शेतकऱ्यांना १२ कोटी ३६ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेने ही योजना प्रभावीपणे राबवल्याने जिल्हा बॅंकेच्या बहुतेक सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. आतापर्यंत वाटप झालेल्या एकूण लाभार्थ्यांमध्येही सोलापूर जिल्हा बॅंकेच्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांतर्गत पात्र शेतकऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. त्यातही काही ठराविक बॅंका वगळता काही बॅंकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com