सात लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४,८०७ कोटी जमा

uddhav thakarey
uddhav thakarey

मुंबई: महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत (ता. ३ दुपारी १२ पर्यंत) १० लाख लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यानुसार ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. ३) दिली. विधिमंडळ पत्रकार कक्षात ते पत्रकारांशी बोलत होते.  या वेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सुरू केल्याबद्दल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच इतर अधिकारी व तंत्रज्ञांचे अभिनंदनही केले.   कर्जमाफीसंदर्भात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘योजनेअंतर्गत ३५ लाख ८०९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड झालेली आहेत. त्यापैकी पहिली यादी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्जखात्यांचा समावेश होता.  १५ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार कर्जखात्यांची दुसरी यादी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या ६ जिल्ह्यांतील ५ लाख कर्जखात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापैकी १० लाख ३ हजार ५७३ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांकडून पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये जमा झाले आहेत.’’ 

कर्जमुक्ती योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

  • केवळ २८ दिवसांत पोर्टल सुरू झाले. महाआयटीने स्वत: विकसित केलेले हे सॉफ्टवेअर आहे. कुठल्याही खासगी व्हेंडरचा यात समावेश नाही.  
  • उच्च क्षमतेचे सर्व्हर व क्लाऊड तंत्रज्ञान पोर्टलसाठी उपयोगात आणल्याने ८० हजारांपेक्षा जास्त आपले सरकार सेवा केंद्र व बँका यांना विना अडथळा आधार प्रमाणीकरण शक्य झाले. प्रतिदिन ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पोर्टलद्वारे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
  • मराठीचा पूर्ण वापर केला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी मराठीत तसेच प्रमाणीकरण व तक्रार नोंद पावतीसुद्धा मराठीतच मिळते.
  • सहकार विभाग, महसूल विभागावर योजनेची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने अविरत तांत्रिक सपोर्ट दिला आहे. 
  • प्रशिक्षण व्हिडिओ, सहज समजेल अशा प्रशिक्षण पुस्तिका यामुळे सर्व स्तरावर यशस्वी प्रशिक्षण देता आले. 
  • आधार प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम आहे, त्याची शेतकऱ्यांना माहिती देऊन मान्यता घेणे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी रांगा लावण्याची वेळ येत नाही.
  • आधार जोडणीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणे व इतर योजनांचा लाभ देणे सहज शक्य होणार आहे. 
  • २०१९ आणि २०१७ मधील कर्जमाफी योजनेतील फरक

  • महात्मा फुले योजनेत कुठलाही फॉर्म भरून घेतला जात नाही. २०१७ मधील योजनेत शेतकऱ्यांना क्लिष्ट फॉर्म भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे.
  • शेतकऱ्यांना पोर्टलवर ऑनलाइन लॉगिन करण्याची आवश्यकता नाही. 
  • सध्याच्या योजनेत केवळ २ ते ३ मिनिटांत प्रमाणीकरण होत असल्याने वेळेचा अपव्यय होत नाही.
  • बँकांना भरावयाची माहिती ही अत्यंत सुलभ केली आहे, त्यामुळे पोर्टलवर लगेच अपलोड झाली. त्यावर केवळ संगणकीय प्रक्रिया करून पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा व तालुका पातळीवर प्रसिद्ध करण्यात आली. २०१७ साली शेतकऱ्यांची यादी ही योजना संपल्यावर प्रकाशित करण्यात आली होती.
  • सध्याच्या महात्मा फुले योजनेत बँकेने भरावयाच्या माहितीमध्ये आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
  • सध्याच्या योजनेत पोर्टल हे आपले सरकार सेवा केंद्र, बँका तसेच स्वस्त धान्य दुकानांशी जोडण्यात आले आहे.
  • याशिवाय अपात्र नावे वगळण्याकरिता आयकर विभागाशी समन्वय.
  • सध्याच्या योजनेत प्रमाणीकरण व तक्रार नोंद पावती मराठीत.
  • पोर्टलवरील विविध मोड्यूल्स वेगवान व लवचिक आहेत. त्यामुळे एकूणच तांत्रिक प्रक्रियेतील उणिवा आणि अडचणी तत्काळ दूर होत आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com