अचूक हवामान अंदाजामुळे ५० हजार कोटींचा फायदा ! : ‘एनसीएईआर’च्या सर्व्हेतून दावा

हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे मागील पाच वर्षांत शेतकरी, पशुधनपालक आणि मच्छीमारांना सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे, असा दावा एका सर्वेक्षणातून समोर आला आहे
हवामान अंदाज, एनसीएईआर climate NCAER
हवामान अंदाज, एनसीएईआर climate NCAER

नवी दिल्ली : हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे मागील पाच वर्षांत शेतकरी, पशुधनपालक आणि मच्छीमारांना पन्नास पट म्हणजे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे, असा दावा एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) हे सर्व्हेक्षण केले आहे. या बाबतचा अहवाल केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी नुकताच (ता.३) एका कार्यक्रमात जाहीर केला. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या राष्ट्रीय मॉन्सून मिशन आणि उच्च कामगिरी संगणकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या हवामान अंदाजाबाबत हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) ३,९६५ शेतकरी, ७५७ मच्छीमार आणि १,३७६ पशुपालक, असे एकूण ३,९६५ जणांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. शिवाय इंटरएक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. त्यातून असे निदर्शनास आले, की दरवर्षी सुमारे १३ हजार कोटी आणि पाच वर्षांत सुमारे ५० हजार कोटींवर फायदा शेतकरी आणि पशुपालकांना झाला आहे. 

प्रदूषण, पूरस्थितीचाही अचूक अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मुख्य सचिव एम. राजीवन म्हणाले, ‘‘या दोन प्रकल्पांमुळे फक्त मॉन्सूनचाच अचूक अंदाज वर्तविण्यात आला असे नाही. तर विशेषकरून राजधानी दिल्लीतील प्रदूषणाबाबत अचूक अंदाज वर्तविणे शक्य झाले. शिवाय देशातील पूरस्थितीचा ही अचूक अंदाज वर्तविणे शक्य झाल्याने मोठे नुकसान टाळता आले. मॉन्सूनचा अंदाज वर्तविणे आणि अंदाज वर्तविण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. अल्प काळात हवामानाचा अंदाज वर्तविण्याची क्षमता ही निर्माण झाली आहे. पशुपालक, शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा झाला. हवामानाचा पूर्व अंदाज व्यक्त केल्यामुळे जनावरांचा चारा, चारा नियोजन, निवारा याची व्यवस्था करणे शक्य झाले. शेतीतील पिकांचा काढणी, काढणीनंतरचे व्यवस्थापन योग्य वेळी झाल्याने नुकसान टळले आहे. समुद्रातील वादळांचा पूर्व अंदाज वर्तविल्यामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर टळली आहे.’’

असा होता प्रकल्प सन २०१२ ते २०१८ या काळात ५५१ कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय मॉन्सून मिशन सुरू करण्यात आले होते. हवामानाचा अंदाज वर्तविण्याची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ४३८.९ कोटी, असे एकूण ९९० कोटी रुपये दोन प्रकल्पांवर खर्च करण्यात आले. मात्र या दोन्ही प्रकल्पांपासून पाच वर्षांत देशातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांना सुमारे पन्नास पट म्हणजे ५० हजार ४४७ कोटींचा फायदा झाला आहे. ‘‘हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे पशुपालकांना वेळेत लसीकरण करता आले. शेती, जनावरांच्या चारा पिकांचे योग्य व्यवस्थापन, नियोजन करता आले,’’असे पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com