बार्शी, उत्तर सोलापूर, बल्लारपूर तालुक्यांसाठी नुकसान भरपाईसाठी ५६ कोटी

दुष्काळ
दुष्काळ

मुंबई: २०१८-१९ च्या रब्बी हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५६ कोटी रुपयांची मदत शासनाने उपलब्ध करून दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.  राज्य शासनाने यासंदर्भातील मदतीचे निवेदन केंद्र सरकारला सादर केले आहे. मात्र, केंद्राची मदत मिळण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने स्वतःच्या निधीतून ५६ कोटी ६१ लाख रुपये इतकी रक्कम वाटप करण्यात येणार आहे. या तीन तालुक्यांतील १९५ गावांमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुष्काळग्रस्त भागातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निकषानुसार निविष्ठा अनुदान देण्यात येते. ३३ टक्के पीक नुकसान ठरवण्यासाठी हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी त्या ग्रामपंचायती क्षेत्रात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निकालानुसार आलेल्या पीकनिहाय उत्पन्नाचा आधार घेऊन ६७ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न आलेल्या पिकांखालील क्षेत्राला पात्र ठरवून संबंधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाते; तसेच रब्बी हंगामातील सातबारा उताऱ्यावरील पिकाच्या नोंदीच्या आधारे मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.  बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात येते. त्यासाठी सातबारा उताऱ्यावरील नोंदी तपासल्या जाणार आहेत. ही मदत दोन हेक्टरच्या आणि लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेतच दिली जाईल; तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे. त्यातून कोणतीही कपात न करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या तीन तालुक्यांत  दुष्काळ जाहीर केल्यानंतर या ठिकाणी आठ दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत; तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यात गंभीर स्वरूपाचा; तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com