राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन जादा ऊस 

राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित अंदाजापेक्षा ५९ लाख टनाने वाढली आहे. त्यामुळे एकूण उपलब्धता ८७४ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
cane
cane

पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित अंदाजापेक्षा ५९ लाख टनाने वाढली आहे.  त्यामुळे एकूण उपलब्धता ८७४ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली.  साखर आयुक्तालयाने विविध साखर कारखान्यांकडून घेतलेल्या मागोव्यानंतर ८१५ लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज गेल्या महिन्यात व्यक्त केला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार हीच ऊस उपलब्धता आता ६.७५ टक्क्यांनी जादा दिसते आहे.  “मॉन्सून सुरू झाल्यानंतर  उसाचे लागवड क्षेत्र आम्ही पहिल्या अंदाजात १० लाख ६६ हजार हेक्टरपर्यंत गृहीत धरले होते. त्यातून गाळपासाठी ८१५ लाख टन ऊस अपेक्षित होता. याच ऊस उपलब्धतेनुसार साखर उत्पादन ९२ लाख टन अपेक्षित होती. मात्र, आता पावसामुळे सर्व गणिते बदलली आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  दुसऱ्या अंदाजानुसार, आता राज्यातील ऊस लागवड ११ लाख ४२ हजार हेक्टरच्या पुढे गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे गाळपाला किमान ८७४ लाख टन ऊस मिळू शकेल. उतारा साडेअकरा टक्के मिळाल्यास साखर उत्पादन सहजपणे ९९ लाख टनावर जाईल, असे साखर आयुक्तालयाला वाटते.   महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचा ''ऊस उपलब्धता अंदाज'' मात्र आयुक्तालयापेक्षाही जादा आहे. साखर आयुक्तालयाच्या अंदाजापेक्षाही किमान २५ ते २६ लाख टन जादा ऊस राज्यात उभा आहे. ऊस भरपूर असल्याने वेळेत गाळप, जादा इथेनॉल निर्मिती आणि आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीवर भर देण्याचा आग्रह आम्ही कारखान्यांना करतो आहे, असे संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया साखर उद्योगात सध्या ऊस उपलब्धतेविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार शेतकऱ्यांकडून यंदा किमान ९०० लाख टन ऊस कारखान्यांकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांची जबाबदारी मोठी आहे. आम्हाला गाळप नियोजनात चांगलीच कसरत करावी लागेल - जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com