साठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला बळी 

कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी विभागात आतापर्यंत ६० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.
corona
corona

पुणे ः कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी विभागात आतापर्यंत ६० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सरकारने आता अजिबात हलगर्जीपणा न दाखवता कृषी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी महासंघाने केली आहे. 

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे सोडून सध्या कृषी खात्यात बदल्यांच्या प्रक्रियेवर जोर दिला जात आहे. त्यामुळे महासंघाने आता आपली भूमिका स्पष्ट करीत, ‘‘कृषी खात्यातील सर्व प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया रद्द करावी, अन्यथा क्षेत्रीय कामकाजावर बहिष्कार टाकू,’’ असा इशारा दिला आहे. 

माजी फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या महासंघाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून काही मुद्दे मांडले आहेत. “महसूल व ग्रामविकास विभागाप्रमाणेच पूर्वलक्ष प्रभावाने कृषी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. ही घोषणा न केल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदतीपासून वंचित राहावे लागत आहे,” असे महासंघाने म्हटले आहे. 

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना तत्काळ ५० लाखांचे सानुग्रह अनुदान द्यावे, क्षेत्रीय पातळीवर विविध योजनांची कामे सध्या करताना प्राधान्यक्रम ठरवावा, जनसंपर्क असलेल्या योजना स्थगित कराव्यात, असे उपाय महासंघाचे सुचविले आहेत. 

कृषी कर्मचाऱ्यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात विविध जिल्ह्यांमध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने सेवा अधिग्रहण तत्काळ रद्द करण्याबाबत मंत्रालयातून आदेश जारी करावेत तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, असाही आग्रह महासंघाचा आहे. 

महाराष्ट्र कृषी राज्य कृषी सहायक संघटनेचे बापूसाहेब शेंडगे, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे संजय पाटील, कृषी अधिकारी संघटनेचे नितेंद्र पानपाटील, कृषी अधिकारी वर्ग दोन संघटनेचे अभिजित जमदाडे, कृषी अधिकारी वर्ग एक संघटनेचे कैलास खैरनार यांनी या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.  शेतीशाळा ऑनलाइन घ्या  शेतीशाळेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना गावोगाव फिरून जनसंपर्काच्या माध्यमातून शेतीशाळा घेण्याची सक्ती केली जात आहे. कोविडमुळे सर्व शेतीशाळा रद्द कराव्यात व ऑनलाइन उपक्रम घेण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.  कृषिमंत्री, सचिवांच्या पाठपुराव्यामुळे वारसांना मदत  कोविड १९ साथ नियंत्रणात कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळे आतापर्यंत दोन कृषी कर्मचाऱ्यांना मंजूर झाली आहे.कोविड साथ नियंत्रण काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती कृषी आयुक्तालयाकडून संकलित केली जात आहे. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव देखील तातडीने पाठवले जात आहेत. कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले की, ‘‘कोविड साथीच्या नियंत्रणात कृषी खात्याचे कर्मचारी आपआपल्या भागात विविध सेवा बजावत आहेत. कोरोना संसर्ग झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना मदत मिळण्याबाबत कृषिमंत्री व सचिवांच्या पातळीवर मोठा पाठपुरावा सुरू आहे. यात कृषी सहायक रविकिरण बोदवडे (मलकापूर,जि.बुलढाणा) व पर्यवेक्षक सुभाष गडकर (अहमदपूर,जि.लातूर) यांच्या वारसांना ५० लाखाची मदत मंजूर झाली आहे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com