अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे रिक्त 

या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची वस्तुस्थिती असताना येथील कृषी विद्यापीठालाही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहण लागलेले आहे.
PDKV AKOLA
PDKV AKOLA

अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची वस्तुस्थिती असताना येथील कृषी विद्यापीठालाही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहण लागलेले आहे. विद्यापीठाअंतर्गत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या या पदांचा विद्यापीठाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे विदर्भातील ११ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. पूर्व विदर्भाची पीक पद्धती वेगळी तर पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यातील वेगळी आहे. या दोन्ही भौगोलिक परिस्थितीत विद्यापीठाचा डोलारा सांभाळावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाअंतर्गत शिक्षकेत्तर पदे वगळता इतर सुमारे २६८२ पदे मंजूर आहेत. सध्या केवळ १०९१ पदे भरलेली आहेत. सुमारे १५९१ पदे रिक्त आहेत. 

विद्यापीठात अ गटाची ११ पदे मंजूर असताना केवळ तीनच पदे भरलेली आहेत. ब गटाची २७६ पदे असून ११७ रिक्त आहेत. क संवर्गातील ९६२ पदांपैकी ५४७ तर ड गटातील मंजूर १४३३ पदांपैकी तब्बल ९१९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा अनुशेष वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहेत. 

विद्यापीठाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असता. लोकप्रतिनिधी सातत्याने विद्यापीठाच्या कार्यशैली, संशोधनात्मक कामांवर बोट ठेवत असतात. काही जण ‘पांढरे हत्ती’ पोसण्याचा आरोपही करीत असतात. एकीकडे हे आरोप तर दुसरीकडे कमी कर्मचाऱ्यांमध्ये विद्यापीठाचे कामकाज चालविण्याचे ‘दिव्य’ पार पाडले जात आहे. विद्यापीठातील पदे भरण्यासाठी प्रत्येक सरकारने आश्‍वासने दिली. घोषणाही केल्या. प्रत्यक्षात मात्र हे काम झालेले आहे. अनेक जण नोकरभरतीसाठी प्रतिक्षा करीत आहेत. 

कार्यकारी परिषद सदस्य आमदारांकडून अपेक्षा  विद्यापीठाअंतर्गत सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याने संशोधन, विस्तार, शैक्षणिक कामकाज प्रभावित झालेले आहे. रिक्त पदांमुळे प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सांभाळण्याची वेळ आलेली आहे. विद्यापीठात रिक्त असलेली पदे भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील, विदर्भातील लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविण्याची गरज आहे. सध्या या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सत्तारूढ महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे कार्यरत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी आमदारांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील महत्त्वाच्या व डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठातील रिक्त पदे भरून घेण्याची जबाबदारी आमदारांनी घेण्याची गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com