कपाशीचे ६३ हजार हेक्टर क्षेत्र फरदडमुक्त; बोंड अळी टाळण्यासाठी मोहिम

फरदड कपाशी
फरदड कपाशी

परभणी: यंदाच्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गतवर्षी (२०१८-१९) कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या फरदडमुक्त गाव मोहिमेअंतर्गत कपाशीचे सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्र फरदडमुक्त करण्यात आले. यामुळे यंदा बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात गतवर्षी (२०१८-१९) कोरडवाहू क्षेत्रात १ लाख ७० हजार हेक्टरवर आणि बागायती क्षेत्रात १९ हजार ८६९ हेक्टर असे एकूण १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. जिल्ह्यातील बहुतांश भागातील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. कृषी विभाग, कृषी विद्यापीठातर्फे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. कमी पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीच्या १ ते २ वेचण्या झाल्यानंतर पिकांचा झाडा झाल्याने झाडावर नवीन पालवी फुटली नाही. पाते, फुले , बोंडे राहिली नाहीत. मात्र बागायती क्षेत्रात कपाशीच्या २ ते ३ वेचण्यांनंतर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाला पाणी दिले.   बागायती क्षेत्रावरील पाणी दिलेल्या पिकांचे सर्वेक्षण केले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळला होता. त्यामुळे कृषी विभागातर्फे जिल्ह्यात १४ नोव्हेंबर २०१८ पासून १५ जानेवारी २०१९ या कालावधीत फरदडमुक्त गाव मोहीम राबविण्यात आली. 

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कपाशीचे सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्र फरदडमुक्त झाले. यंदा सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे पूर्वहंगामी कपाशीच्या क्षेत्रातदेखील घट झाली आहे. यामुळे या क्षेत्रावर यंदाच्या खरीप हंगामातील कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यासासाठी मोठी मदत होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com