जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवनासाठी चिपळूणातील ६३४ आंबा उत्पादक सज्ज

जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवनासाठी चिपळूणातील ६३४ आंबा उत्पादक सज्ज
जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवनासाठी चिपळूणातील ६३४ आंबा उत्पादक सज्ज

चिपळूण  ः वीस वर्षांपेक्षा अधिक काळाच्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन करण्याच्या योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत ६३४ शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार योजना आखली गेली आहे. एमआयडीएच योजनेच्या माध्यमातून आंब्यांच्या बागांसाठी पुनरुज्जीवन योजना सुरू झाली आहे.  त्यामध्ये आंबा उत्पादकांना आंबा बागेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. यामध्ये नांग्या भरणे हा पहिला टप्पा आहे. त्यामध्ये मृत झालेल्या झाडांच्या जागी नवीन झाड लावता येईल. ज्या फांद्यांना कीड पडून त्या खराब झाल्या आहेत अशा फांद्याची छाटणी करावयाची आहे. सेंट्रल ओपनिंग पद्धतीमध्ये खोड मोठे होऊन फांद्या पसरण्यास अडथळा होतो. तेव्हा खोड कमी करून फांद्या पसरण्याचे काम केले जाईल.  आंब्यांच्या बागेसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन केले जाईल. त्यासाठी आंबा बागेतील मातीची नमुना कृषी खात्याकडून तपासला जाईल. त्यानुसार तेथील मातीमध्ये कमी असलेली मूलद्रव्ये भरून काढण्यासाठी खताची योग्य मात्रा निश्‍चित केली जाणार आहे. कीडरोगाच्या बाबतीत तुडतुडे, फळमाशी, भुरी आढळली तर आक्टोबर महिन्यात लगेचच फवारणी केली जावी. कोवळ्या फुटीवर तुडतुडे आल्यास सायफरमेथ्रीन किवा फेनव्हलरेट वापरावे. बोंगे फुटत असताना दुसरी फवारणी करावी. त्यानंतर मोहोर फुटण्याच्या आधी तिसरी फवारणी केली पाहिजे. त्यानंतर दोन आठवडे पूर्ण होताच शेवटची चौथी फवारणी करावी अशी शिफारस केली गेली आहे. आंब्याच्या बागेत मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ढेंचा, ताग किंवा ग्लोरीसीडीया अशा हिरवळीच्या खताचा वापर केला पाहिजे. १ हेक्टरपर्यंतच्या आंबा बागेच्या पुनरुज्जीवनासाठी वीस हजार रुपये अनुदान दिले जात आहे. आंबा बाग किमान १० गुंठे असली पाहिजे. या योजनेसाठी आत्तापर्यंत ६३४ अर्ज कृषी खात्याकडे आले आहेत. याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र चव्हाण म्हणाले, या योजनेसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. आक्टोबर महिन्यातच आंब्याच्या पुनरुज्जीवनाची ही कामे योग्य पद्धतीने करणे शक्य आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com