कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीत

बाजारात कापसाचे दर कमी असल्याने पणन महासंघाला कापूस विक्री होत आहे. परंतु, ‘सीसीआय’कडून एफएक्‍यू दर्जाचाच कापूस खरेदीचे निर्देश आहेत. त्यामुळे त्याच दर्जाच्या कापसाची खरेदी पणनकडून केली जात आहे. या वर्षी खरेदी केलेल्या ८८ टक्‍के कापसावर प्रक्रियाही झाली आहे. — अनंतराव देशमुख, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ
cotton procurement
cotton procurement

अमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला हमीभावाने कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी कापूस महासंघाकडून २ हजार १५६ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यातील १५०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ६४७ कोटी रुपयांच्या वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.   बाजारात कापसाचे दर पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे महासंघाकडे कापूस देण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. महासंघाने आजवर तब्बल ३९ लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी केली आहे. येत्या आठवड्यात हा आकडा ५० लाख क्‍विंटलवर जाण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला आहे. गेल्या पाच वर्षातील ही विक्रमी खरेदी ठरणार आहे. पणन महासंघाकडून यावर्षी ५५५० रुपयाच्या हमीभावाने कापसाची खरेदी केली जात आहे. राज्यात यावर्षी २७ नोव्हेंबर २०१९ पासून  कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली. तेव्हापासून आजवर सुमारे ३९ लाख  क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ११ लाख २४ हजार क्‍विंटल कापूस विदर्भात तर उर्वरित महाराष्ट्रात २७ लाख ६० हजार १६९ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली. खरेदी केलेल्या एकूण कापसापैकी ८८ टक्‍के कापसाचे जिनींग पूर्णत्वास गेले आहे.  ५५५० रुपये क्‍विंटलचा हमीभावानुसार २ हजार १५६ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. त्यापैकी १५०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले उर्वरित ६४७ कोटी रुपये लवकरच खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले. चुकाऱ्यासाठी २३०० कोटी रुपयांचे कर्ज बॅंक ऑफ इंडियाने  म्हणून दिले. त्याकरिता शासन गॅरंटी दिली जाते. १८०० कोटीची बॅंक गॅरंटी शासनाने पहिल्या टप्प्यात दिली आहे. त्यानुसार यापुढील काळात चुकारे करण्यासाठी पुन्हा कर्जाची गरज भासणार असल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  झोननिहाय्य खरेदीची स्थिती (क्‍विंटलमध्ये)

नागपूर १९३५४४
वणी ५१९६०
यवतमाळ ४७९८०२
अकोला ७१०८२
अमरावती १९५९३६
खामगाव १६९२२७
औरंगाबाद ५४२५८२
परभणी ३६१३७०
परळी १२४१५५८
नांदेड ९५७९७
जळगाव ५६२३४१
एकूण ३९ लाख ६५ हजार १९९

परळी झोनमध्ये वाढला लोड ‘सीसीआय’करिता त्यांच्या निकषानुसार पणन महासंघाकडून खरेदी होत आहे. मराठवाड्यातील परळी झोनमध्ये मात्र खराब प्रतीचा कापूस घेण्याचा आग्रह धरला जात असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगितले. या झोनमध्ये सर्वाधिक १२ लाख २५ हजार क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ‘सीसीआय’कडून केवळ एफएक्‍यू दर्जाचा कापूसच घेण्याचे आदेश असल्याने पणन महासंघासमोरील हलक्‍या प्रतीचा कापूस कसा घ्यावा , असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com