कोपरगावातील शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे ६५ लाख अडकले

हमी केंद्रावर अवघी पाचशे क्विंटल खरेदी
हमी केंद्रावर अवघी पाचशे क्विंटल खरेदी

कोपरगाव, जि. नगर ः राज्य सरकारच्या किमान आधारभूत हमी भाव केंद्रावर हरभरा विकलेल्या तालुक्‍यातील १२९ शेतकऱ्यांचे तब्बल ६४ लाख ७२ हजार ४०० रुपये अजूनही अडकले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, सरकारने ठरवून दिलेले क्षेत्र व हेक्‍टरी उत्पादनात तफावत आल्याने हे पैसे अडकल्याचे, एजन्सी म्हणून काम पाहणारे कोपरगाव तालुका शेतकरी सहकारी संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या किमान आधारभूत खरेदी केंद्रावर तालुक्‍यातील तब्बल ४४२ शेतकऱ्यांचा ४७१४ क्विंटल हरभरा शेतकरी संघामार्फत विकला गेला. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांचे तब्बल दोन कोटी सात लाख रुपये देण्यास उशीर झाल्याचा प्रकार ‘सकाळ’ने समोर आणला. आमदार स्नेहलता कोल्हे यांचा रेटा व ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत सरकारने ३१३ शेतकऱ्यांचे एक कोटी ४२ लाख २८ हजार रुपये त्यांच्या खात्यांवर वर्ग केले. मात्र, ऑनलाइन नोंदणी केलेल्या ९१ शेतकऱ्यांचे ४७ लाख ८२ हजार ८०० रुपये, तसेच ऑफलाइन अर्ज दाखल केलेल्या ३८ शेतकऱ्यांचे १६ लाख ८९ हजार ६०० रुपये येणे आहेत.

हरभरा खरेदीसाठी सरकारने काढलेला हेक्‍टरी उत्पादन दराचा नियम व जास्तीच्या उत्पादनात तफावत आल्याने ९१ शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय, ऑफलाइन हरभरा विकणाऱ्या ३८ शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यात अडचणी येत असल्याचे शेतकरी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे पैसे तातडीने देण्याची मागणी होत आहे.

ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या ९१ शेतकऱ्यांचे ४७ लाख ८२ हजार ६०० रुपये महिनाअखेर जमा होणार असल्याचे पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या हेक्‍टरी उत्पादनापेक्षा जास्त हरभरा शेतकऱ्यांनी दिल्याने अडचण झाली आहे. ऑफलाइन अर्ज दाखल करून माल विकणाऱ्या शेतकऱ्यांचे पेमेंट धनादेशाद्वारे करावे, असे पत्र शेतकरी संघाने सरकारला दिले आहे. - हरिभाऊ गोरे, व्यवस्थापक, शेतकरी सहकारी संघ, कोपरगाव

हरभरा विकून सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या हातात छदामही आलेला नाही. त्यामुळे सहा महिन्यांपासूनच्या थकीत रकमेवरील व्याजही सरकारने द्यावे. अशा योजनेमुळे शेतकरी देशोधडीला लागतील. - साहेबराव शिलेदार, माजी नगराध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com