मराठवाड्यात ६६ तालुक्‍यांना पाणीटंचाईची झळ

मराठवाड्यात ६६ तालुक्‍यांना पाणीटंचाईची झळ
मराठवाड्यात ६६ तालुक्‍यांना पाणीटंचाईची झळ

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६६ तालुक्‍यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील चार व जालना जिल्ह्यातील एका शहराची तहानही टॅंकरवर अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्हा दुष्काळाच्या रडारवर असून, या जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यात मराठवाड्यातील सर्वाधिक १६२ टॅंकरने लोकांची तहान भागविण्याचे काम सुरू आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ९, जालना जिल्ह्यातील सर्व ८, परभणी जिल्ह्यातील ९, हिंगोलीमधील ५, नांदेडमधील ६, बीडमधील सर्व ११, लातूरमधील १०; तर उस्मानाबादमधील ८ तालुक्‍यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. काही तालुक्‍यांत नुकतेच पाणीटंचाई जाणवत असल्याने काढल्याचे टॅंकरच्या संख्येवरून दिसते; तर काही तालुक्‍यांत पाणीटंचाईने संपूर्ण तालुक्‍यालाच व्यापल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी पाच तालुक्‍यांत शंभरपेक्षा जास्त टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी फेऱ्या मारत आहेत. 

सिल्लोड तालुक्‍यात सर्वाधिक १६२ टॅंकर सुरू असून, त्यापाठोपाठ गंगापूर तालुक्‍यात १५४, औरंगाबाद १४८, वैजापूर १४६, पैठण ११७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्‍यात टंचाईच्या झळा सर्वाधिक बसत आहेत. या तालुक्‍यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वाधिक १३७ टॅंकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ गेवराई तालुक्यात ११०; तर बीड तालुक्‍यात १०९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

शिरूर तालुक्‍यातही जवळपास ९० टॅंकरने; तर पाटोदा तालुक्‍यात ५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. इतर तालुक्‍यांत ३ ते २१ पर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक ७९ टॅंकर भोकरदन तालुक्‍यात सुरू आहेत. त्यापाठोपाठ जाफ्राबाद तालुक्‍यात ५५, बदनापूर ५१; तर अंबड तालुक्‍यात ५४ टॅंकरने लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com