सोयाबीनच्या बीजोत्पादनात ६७ टक्क्यांनी घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : जुलै-आॅगस्ट महिन्यांतील पावसाच्या दीर्घ खंडामुळे उतारा घटला. त्यानंतर ऐन काढणीच्या काळात पाऊस आल्याने दाणे भिजून खराब झाले. उगवण शक्ती कमी झाली आहे. परिणामी नापास बियाणाचे प्रमाण वाढल्याने यंदा महाबीजच्या परभणी विभागात सोयाबीनच्या बीजोत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत ६५ ते ६७ हजार क्विंटलपर्यंत घट आली आहे.

यंदा २ लाख ६० हजार ३४ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. नापास बियाणाचे प्रमाण वाढल्यामुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन बियाणाची उगवणशक्ती जास्त तर परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील बियाणाची उगवण शक्ती कमी असल्याचे चाचण्याच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे.

महाबीजच्या परभणी विभागांतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या २० हजार ६८८ हेक्टरवरील सोयाबीन पिकांपासून ९ हजार ११ शेतकऱ्यांकडून २ लाख ९२ हजार ५९३ क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित होते. परंतु, सोयाबीनच्या पेरणी नंतर जुलै-आॅगस्टमध्ये आलेल्या पावसाच्या दीर्घ खंडामुळे उताऱ्यामध्ये मोठी घट आली.

त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस आणि आॅक्टोबरच्या सुरवातीस ऐन काढणीच्या काळात पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पावसात भिजून दाण्यावर बुरशी वाढली. काही भागात शेंग किडीमुळे कळकाचे प्रमाण वाढले आहे. या बाबींचा परिणाम बियाणाच्या उगवण शक्तीवर झाला आहे. उगवणशक्ती ७० टक्के पेक्षा कमी येत असल्यामुळे नापास बियाणाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

बुधवार (ता.२७) पर्यंत योग्य उगवणशक्ती असलेल्या ४ हजार ७४७ लाॅटचे २ लाख ६० हजार ३४ क्विंटल बियाणे पास करण्यात आले आहे. पास झालेल्या बियाणांपैकी ३ हजार ७१७ शेतकऱ्यांचे १ लाख ९५ हजार ८३३ क्विंटल बियाणे महाबीजकडे जमा झाले आहे.

यामध्ये परभणी जिल्ह्यातील ७२७ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ९७८ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ५११ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ५० क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील २२८ शेतकऱ्यांच्या १५ हजार ७०० क्विंटल, लातूर जिल्ह्यातील ३१६ शेतकऱ्यांच्या १४ हजार ५९४ क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांच्या ३५ हजार क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील २१ शेतकऱ्यांच्या ७०३ क्विंटल बियाणाचा समावेश आहे. २०१६ मध्ये सोयाबीनचे ३ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले होते.

गतवर्षीच्या तुलनेत ६५ ते ६७ हजार क्विंटलची घट आली आहे. यंदा मूग, उडिद बीजोत्पादनाला पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. एकूण ४२ शेतकऱ्यांचे ३२९ क्विंटल मुगाचे आणि १६६ शेतकऱ्यांचे १ हजार ४३७ क्विंटल उडिदाचे बियाणे महाबीजकडे प्राप्त झाले आहे.

यंदा पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचा एकरी दीड क्विंटल उतारा आला आहे. काढणीच्या वेळी पावसात भिजून डागील झाल्यामुळे लो ग्रेड बियाणाचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी एकरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले होते. - नरेश शिंदे, बीजोत्पादक शेतकरी, सनपुरी, जि. परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com