फलोत्पादन अभियानांतर्गत ७१ सामूहिक शेततळी

फलोत्पादन अभियानांतर्गत ७१ सामूहिक शेततळी
फलोत्पादन अभियानांतर्गत ७१ सामूहिक शेततळी

परभणी ः परभणी जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानंतर्गत २०१८-१९ या वर्षात ७१ सामूहिक शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना फळबागा जोपासण्यासाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार पाटील यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उद्भवत असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी राहत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत सामूहिक शेततळ्यांची निर्मिती करून त्यामध्ये शेतातील उपलब्ध पाणीस्रोतांचे पाणी साठवून संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. पावसाचा खंडकाळ तसेच उन्हाळ्यामध्ये शेततळ्यातील पाणी ठिंबक, तुषार पद्धतीव्दारे पिकांना देणे शक्य होत आहे. संरक्षित सिंचनामुळे उत्पादन वाढ होते. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सामूहिक शेततळे घेण्याकडे वाढत आहे. 

२०१८-१९ वर्षात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ७१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये परभणी तालुक्यात १६ शेततळी, जिंतूर तालुक्यात १३ शेततळी, पूर्णा तालुक्यात ११ शेततळी, सेलू तालुक्यात ९ शेततळी, मानवत तालुक्यात ६ शेततळी, गंगाखेड तालुक्यात ५ शेततळी, पाथरी तालुक्यात ४ शेततळी, सोनपेठ आणि पालम तालुक्यात प्रत्येकी एक शेततळे पूर्ण झाले आहे. या योजनेंतर्गत शेततळे खोदकाम, अस्तरीकरण, कुंपणासाठी आकारमानानुसार अनुदान देण्यात येते. 

आजवर ६६ शेतकऱ्यांना २ कोटी १२ लाख ७९ हजार रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीत शेततळ्यातील पाण्यावर संत्रा, मोसंबी, चिकू, आंबा आदी फळपिकांचे उत्पादन घेऊन बागा जोपासता आल्या. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेततळे पाण्याने भरून घेतले होते. त्यामुळे यंदाच्या दुष्काळी स्थितीत संत्रा फळबागेला पाणी देता आले. त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले. - प्रशांत लाड,  शेतकरी, जांब, जि. परभणी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com