देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍सलन्स’ 

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल सरकार यांच्यात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आदान-प्रदान विषयक करार करण्यात आला आहे. विविध पिकांसोबतच विदर्भासह देशाच्या काही भागांत मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यांची उत्पादकता वाढीचे प्रयत्नकेले जात आहेत.
72 villages in the country to be 'Village of Excellence'
72 villages in the country to be 'Village of Excellence'

नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल सरकार यांच्यात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आदान-प्रदान विषयक करार करण्यात आला आहे. विविध पिकांसोबतच विदर्भासह देशाच्या काही भागांत मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यांची उत्पादकता वाढीचे प्रयत्न देखील या प्रकल्पातून केले जात आहेत. त्यासाठी पूर्वी सेंटर फॉर एक्‍सलन्स उभारण्यात आले होते. आता व्हिलेज ऑफ एक्‍सलन्सची उभारणी, या प्रकल्पातून केली जात असून, देशातील ७२ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जात असल्याची माहिती इस्राईल येथील तज्ज्ञ डॉ. ऊरी रुबीस्टेन यांनी दिली.  नागपुरी संत्र्याने रंग आणि चवीच्या बाबतीत जागतिकस्तरावर वेगळेपण जपले आहे. मात्र टिकवणक्षमता आणि उत्पादकतेत हे फळ जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर पिछाडीवर आहे. हेक्‍टरी पाच टन इतकी जेमतेम उत्पादकता या फळाची आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व महाराष्ट्र सरकारने या फळाच्या उत्पादकता वाढीसाठी इस्राईलसोबत करार केला आहे. त्याअंतर्गत संत्रा उत्पादकांना मार्गदर्शनासाठी आलेल्या ऊरी रुबीस्टेन यांनी नागपूरात ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘तमिळनाडू, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये फळांवर काम होत आहे. सुरुवातीला कृषी विद्यापीठांमार्फत त्या राज्यांमध्ये इस्राईली लागवड पद्धतीवर आधारित सेंटर फॉर एक्‍सलन्स उभारण्यात आले. लागवड अंतर कमी करून शास्त्रोक्‍त पद्धतीने बागेचे व्यवस्थापन केल्यास उत्पादकता वाढते, हे दाखविण्यासाठी या केंद्रांचा उपयोग झाला. आता विदर्भात इंडो-इस्राईल पद्धतीने पाच हजार हेक्‍टरपर्यंत संत्रा लागवड झाली आहे. या तंत्रज्ञानाचा अधिक विस्तार होण्याकरिता आता सेंटरऐवजी गावाला केंद्रबिंदू ठेवण्यात आले आहे. व्हिलेज ऑफ एक्‍सलन्स या थीमच्या माध्यमातून निवडलेल्या गावातील पाच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाईल. हे मॉडेल फार्मर नंतर तंत्रज्ञान विस्ताराचा केंद्रबिंदू असतील. सध्या भारतातील ७२ गावांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. अशा प्रयत्नांतून उत्पादकता एका मर्यादेपर्यंत वाढेल कारण उत्पादकता वाढीत वाण, भौगोलिक स्थिती, कीडरोग, असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्यामुळे इस्त्राइल व भारताची तुलना करणे अपेक्षित ठरणार नाही.  इस्राईलमध्ये संत्र्याचे दोन वाण  इस्राईलमध्ये संत्र्याचे दोन वाण आहेत त्यातील ‘ऑर’ हे वाण अधिक प्रचलित आहे. ९ ते १२ टन प्रती एकर अशी याची उत्पादकता आहे. युरोप, अमेरिका या देशांमध्ये त्याची निर्यात होते. 

प्रतिक्रिया  जनुकीय परावर्तित पीक तंत्रज्ञान फायदेशीर आणि उपयोगी आहे. परंतु त्याचे बियाणे दर वर्षी एकाच कंपनीकडून घ्यावे लागते हे चुकीचे आहे. एकाधिकार निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना अशा तंत्रज्ञानासाठी जादा पैसे मोजावे लागतात. सद्या केवळ युरोपीयन देशातच अशा उत्पादनांना काही अंशी बंदी आहे. उर्वरित जगात ते स्वीकारले जाते. सेंद्रिय उत्पादनांना देखील अद्याप तितक्‍या प्रमाणात स्वीकारलेले नाही. सेंद्रियची बाजारपेठ देखील मर्यादित आहे. त्यामुळे रासायनिक आणि सेंद्रियचा मध्य साधणे संयुक्‍तिक ठरते.  - ऊरी रुबीस्टेन, तज्ज्ञ, इस्राईल 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com