साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ७३ उमेदवार रिंगणात
साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ७३ उमेदवार रिंगणात

साताऱ्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ७३ उमेदवार रिंगणात

सातारा : आठ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी सोमवारी ३५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ७३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा, पाटण, कोरेगाव, वाई व फलटणमध्ये दुरंगी, तर माण, कऱ्हाड उत्तर आणि कऱ्हाड दक्षिणमध्ये तिरंगी लढती होतील. पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभा लढतीतूनही माघार घेतली. लोकसभेसाठी सात उमेदवार रिंगणात असले, तरी उदयनराजे भोसले (भाजप) व श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी) यांच्यात चुरशीची लढत होईल. 

लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (ता. ७) अखेरचा दिवस होता. आठ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी आज ३५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ७३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सातारा लोकसभेसह माण, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तरेत नाट्यमय घडामोडी घडल्या. 

सातारा लोकसभेसाठी व वाई विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी दोन अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज भाजपच्या उमेदवारांविरोधात होते. त्यामुळे ते बंडखोरी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून श्री. जाधव यांच्याशी संपर्क त्यांनी अर्ज मागे घेतले. माण मतदारसंघातील अनिल देसाई आणि रणजित देशमुख यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरेंविरोधात सर्वपक्षीय आघाडीचे प्रभाकर देशमुख रिंगणात राहिले आहेत. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम आणि अपक्ष म्हणून भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे यांचा अर्ज राहिला आहे. 

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे अतुल भोसले आणि माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील रिंगणात राहिले येथे तिरंगी लढत होत आहे. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण आणि फलटण मतदारसंघांत उमेदवार संख्या जास्त असलीतरी विद्यमान आमदारांविरोधात पारंपरिक दुरंगी लढत होणार आहे. साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे दीपक पवार अशी लढत होत आहे. वाईत राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि भाजपचे मदन भोसले यांच्यात अटीतटीची आणि चुरशीची लढत होणार आहे. 

कोरेगावात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध शिवसेनेचे महेश शिंदे अशी अटीतटीची लढत होणार आहे. पाटणला शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर यांच्यात लढत होत आहे. फलटणला राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण विरुद्ध भाजपचे दिगंबर आगवणे अशी चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत होणार आहे.मतदारसंघनिहाय अर्ज मागे घेतलेल्यांची संख्या व कंसात रिंगणात राहिलेले उमेदवार संख्या अशी आहे. फलटण ५ (११), वाई तीन (१०), कोरेगाव पाच (सात), माण पाच (११), कऱ्हाड उत्तर पाच (सहा), कऱ्हाड दक्षिण सहा (१३), पाटण चार (नऊ), सातारा दोन (सहा).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com