सातारा जिल्ह्यात पावसाने ७६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

763 hectares of crop damage due to rain in Satara district
763 hectares of crop damage due to rain in Satara district

सातारा ः शेतकऱ्यांची संकटाची मालिका कायम असून जिल्ह्यात रविवारी पूर्व भागात झालेल्या अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे. या अवकाळी पावसाच्या हजेरीने फलटण व माण तालुक्यातील ७६३.४० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. गहू पिकास सर्वाधिक फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. 

जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव, कऱ्हाड व पाटण तालुक्यात रविवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने पिके आडवी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी फिरवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारच्या रूपाने राजा उदार होऊन त्याने कर्जमाफी देत शेतकऱ्यांना मदत केली असताना त्याच दिवशी निसर्गाने मात्र पिकांचे अतोनात नुकसान केले. 

जिल्ह्यात रब्बी हंगामातील ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांच्या काढणीची धांदल सध्या शिवारात सुरू असतानाच रविवारी (ता. १) अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. ज्वारी, ऊस, हळद, कांदा, मळणीस आणलेला आणि मळणी झालेला गहू, भाजीपाल्याची, पालेभाज्यांची पिके, कलिंगड, काकडी, टोमॅटो, मका, आंबा, द्राक्षे आदी पिकांचे नुकसान झाले आहे. 

वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या माण, खटाव, फलटण तालुक्‍यांतील काही भागांतील शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार ७६३.४० हेक्टर क्षेत्रावरील बाधित झाले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील २१ गावातील ३८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच माण तालुक्यातील १२ गावातील ३८०.४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकात सर्वाधिक गहू पिकाला फटका बसला असल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे.

पंचनाम्यानंतर कळणार अंतिम आकडेवारी जिल्ह्यात रविवारी पाच तालुक्यांतील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सोमवारपासून पंचनाम्याचे काम सुरू  करण्यात आले होते. प्राथमिक अहवालानुसार फलटण व माण तालुक्यात ७६३.४० क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचे अंतिम आकडे समजणार असले तरी पावसाबरोबर वादळी वारेही आल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com