पुणे : खरिपात उद्दिष्टापैकी ७९ टक्के पीक कर्जवाटप

खरिपात उद्दिष्टापैकी ७९ टक्के पीक कर्जवाटप
खरिपात उद्दिष्टापैकी ७९ टक्के पीक कर्जवाटप

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने खरीप हंगामात जिल्हा बॅंकेने ठेवलेले उद्दिष्ट एक हजार ४३५ कोटी १८ लाख रुपये होते. त्यापैकी एक हजार १४५ कोटी ८२ लाख म्हणजेच ७९ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाटप जुन्नर तालुक्यात केले असल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. 

दुष्काळामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. या काळात त्याला आधार देण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्जासाठी बॅंकांनी अडवणूक करू नये, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला. आतापर्यंत सुमारे एक लाख ४६ हजार ९९८ शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले. गेल्या वर्षी याच काळात एक लाख ३६ हजार ५४२ शेतकऱ्यांना एक हजार १६२ कोटी १२ लाख म्हणजेच ६८ टक्के पीककर्जाचे वाटप केले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जिल्हा बॅंकेने मोठ्या प्रमाणात पीककर्जाचे वाटप केले आहे. यात अजून काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईमुळे शेतकरी भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी करतात. परंतु, या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरिपाचे नियोजन करून पिके घेतात. यंदा पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या शाखांमार्फत गावपातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांनी घेतला आहे. 

बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भूईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप करत आहे. 

नवीन सहा हजार सभासदांना कर्जवाटप 

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत असल्याची भूमिका शेतकऱ्यांमध्ये झाली आहे. यामुळे जिल्हा बॅंकेकडे पीककर्जासाठी नवीन सहा हजार ५९ सभासद झाले आहे. या सभासद शेतकऱ्यांनाही बॅंकेने तब्बल ३१ कोटी ६२ लाख ६३ हजार रूपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. यात शिरूर तालुक्यातून सर्वाधिक १२५८ शेतकरी सभासद झाले आहेत. या शेतकऱ्यांना ७ कोटी ८६ लाख ५० हजार रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com