‘हतनूर’प्रकल्पात १८ टक्के साठा

‘हतनूर’प्रकल्पात १८ टक्के साठा
‘हतनूर’प्रकल्पात १८ टक्के साठा

जळगाव ः खानदेशात मोठ्या नद्यांमध्ये फक्त तापी नदी खळाळून वाहत असून, या नदीवरील हतनूर प्रकल्पातील साठा १८ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. या नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा प्रकल्पाचा साठा मात्र वाढलेला नाही. मागील आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून, पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत.  रावेर तालुक्‍यातील सुकी, भोकरी नदीला चांगले प्रवाही पाणी आले. रावेरातील सुकी, अभोरा व मंगरूळ प्रकल्पाचा जलसाठा वाढला असून, या प्रकल्पांमधील साठा ३० टक्‍क्‍यांवर गेला आहे. तर सुकी प्रकल्पाचा साठाही १८ टक्‍क्‍यांवर आहे. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्प जूनच्या अखेरपर्यंत कोरडा होता. तर वाघूरमधील साठाही फक्त नऊ टक्‍क्‍यांपर्यंत होता. या भागात जोरदार पाऊस झाल्याने तोंडापूर प्रकल्प तब्बल ७८ टक्के भरला आहे. तर वाघूरमधील साठाही सुमारे चार टक्क्‍यांनी वाढला आहे. यावलमधील मोर प्रकल्पातील साठा मात्र वाढलेला नाही. चोपडा तालुक्‍यातील गूळ व अनेर नदीला मात्र हवा तसा पूर आलेला नाही. अर्थातच गूळ व अनेर प्रकल्पातील साठाही वाढलेला नाही. तसेच पश्‍चिम भागातील जिल्ह्यातील "अग्नावती'', "हिवरा'', "बहुळा'', "अंजनी'', "भोकरबारी'', "बोरी'', "मन्याड'', या धरणांत अद्याप शून्य टक्‍के जलसाठा असून, दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक गावांना अजूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गिरणा नदीला पूर आलेला नाही. गिरणा प्रकल्प सर्वांत मोठा आहे. त्याचा लाभ चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्‍यांना होतो. तसेच गिरणा नदी धरणगाव, जळगाव या तालुक्‍यांसाठी जीवनवाहिनी आहे. या नदीला प्रवाही पाणी किंवा पूर येण्याची प्रतीक्षा शेतकरी, ग्रामस्थांना आहे. 

धरणांमधील जलसाठा  हतनूर - १८.२७ टक्‍के, गिरणा - ७.४३, वाघूर - १३.०, अभोरा - ३३.४६, सुकी - १८.५४, मोर - २१.२२, तोंडापूर - ७८.११   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com