साखर कारखान्यांकडून ऐंशी टक्के रक्कम जमा

साखर कारखाना
साखर कारखाना

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून एफआरपीची ८० टक्के रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आरआरसीची कारवाई टळून उर्वरित वीस टक्के रकमेचा भुर्दंड रोखण्यासाठी साखर कारखानदार उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असतानाच ‘स्वाभिमानी’ही कॅव्हेट दाखल करणार आहे.   एफआरपीच्या तिढ्याला आता वेगळे वळण लागण्याची शक्‍यता आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीच्या ऐंशी टक्के रक्कम अखेर उत्पादकांच्या खात्यात जमा केली आहे. साखर आयुक्तांनी कारवाईचा आदेश झाल्यानंतर कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने पाऊले उचलत ही रक्कम जमा केली, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उर्वरित वीस टक्के एफआरपी मिळविण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. आरआरसीची कारवाई टळून उर्वरित वीस टक्के रकमेचा भुर्दंड रोखण्यासाठी कारखानदार उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. न्यायालयाने एकतर्फी निकाल देऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज (सोमवार) उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली. यामुळे एफआरपीचा लढा आता रस्त्यावरून न्यायालयात पोचण्याची शक्‍यता आहे.  दरम्यान कारखान्यांनी ऐंशी टक्के रक्कम जमा केल्याने काहीसा दिलासा ऊस उत्पादकांना मिळाला आहे, परंतु ही रक्कम शेतकऱ्यांना फारशी महत्त्वाची ठरणार नसल्याने उर्वरित एफआरपीसाठीचा स्वाभिमानीचा लढा तीव्र करणार असल्याची माहिती स्वाभिमानीच्या सूत्रांनी दिली.  दोनच दिवसांपूर्वी आयुक्तालयांकडून साखर जप्तीच्या नोटिसा आल्याने हतबल झालेल्या साखर कारखानदारांनी कारखाने चालविणे अशक्‍य झाले आहेत. परिणामी ते बंद ठेवावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत दिला होता. परंतु यानंतरही सरकारच्या धोरणात काहीच फरक न पडल्याने कारवाई टाळण्यासाठी अखेर साखर कारखान्यांना थकबाकीच्या ऐंशी टक्के रक्कम जमा करावी लागली.  आता उर्वरित रकमेसाठीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका कायम आहे. यामुळे अनेक तालुक्‍यातील तहसीलदार कार्यालयात जाऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबधित तालुक्‍यातील कारखान्यावर कारवाई करण्याबाबत दबावतंत्र सुरू केल्याने साखर पट्ट्यातील आंदोलनाचा माहोल अद्याप ही कायमच आहे. कारखानदारांनी थकीत रकमेसाठी उत्पादकांचे नुकसान न करता सरकारविरोधात आंदोलन करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com