85 percent water storage in Girna dam
85 percent water storage in Girna dam

गिरणा धरणात ८५ टक्के पाणीसाठा

भडगाव, जि.जळगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा आणि शेत भिजविणाऱ्या गिरणा धरणात सोमवारी (ता. ७) ८५ टक्के जलसाठा झाला.

भडगाव, जि.जळगाव  : निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा आणि शेत भिजविणाऱ्या गिरणा धरणात सोमवारी (ता. ७) ८५ टक्के जलसाठा झाला. धरणात पाणलोट क्षेत्रातील धरणातून आवक सुरू असल्याने गिरणा धरणातून केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाने केले आहे.

परिसरात पाऊस किती झाला, यापेक्षा गिरणा धरणात किती साठा वाढला, याकडे निम्म्या जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असते. एक जूनला गिरणा धरणात ३१ टक्के जिवंत साठा होता. तीन महिन्यांत धरणात ५४ टक्के साठा वाढला. धरणात १५ हजार ६०५ दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा आहे. तर, तीन हजार दशलक्ष घनफूट मृत साठा असून, एकूण १८ हजार ६०५ दशलक्ष घनफूट साठा आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी तीन धरणे शंभर टक्के भरली. दोन धरणांतही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा आहे. त्या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. तर चणकापूर ९४.१५ टक्के, पुनंदमध्ये ९५ टक्के साठा आहे. ठेंगाळा बंधाऱ्यातून सोमवारी तीन हजार ४४४ क्यूसेक पाण्याची धरणात आवक सुरू असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे एस. आर. पाटील यांनी सांगितले.

मन्याड धरणातून गिरणा पात्रात पाणी येत असून, नदी प्रवाही झाली आहे. गिरणाच्या पाण्यावर अवलंबून १५८ ग्रामीण व चार पालिकेच्या पाणीयोजनांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. मात्र, कालव्यांमध्ये पाणी येण्यासाठी धरणात अजून साठा होणे आवश्यक आहे. धरणाच्या पाण्यावर जवळपास ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. 

अनेर धरण ‘फुल्ल’; नदीपात्रात विसर्ग

गणपूर (ता. चोपडा, जि.जळगाव)  येथून जवळच असलेले अनेर धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. दरवाजांमधून अनेर नदीपात्रात पाणी सोडले आहे. धरणाचे सर्व दहा दरवाजे १५ ऑगस्टला बंद केले होते. धरण भरल्याने एका दरवाजाद्वारे २५ सेंटिमीटर उचलून पाणी सोडल्याने नदी पुन्हा खळखळून वाहू लागली आहे. पाणीसाठा समाधानकारक असल्याने कांदा व रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, दादर, ज्वारी व चाऱ्याच्या पिकांसाठी मुबलक पाणी मिळण्याची शाश्‍वती झाल्याचे शाखा अभियंता पी. बी. पाटील यांनी सांगितले.  

गिरणा धरणात ८५ टक्के साठा आहे. लवकरच धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी. - धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे, जळगाव

गिरणा धरणात पाणलोट क्षेत्रातील धरणातून अशीच आवक कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी  पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशा नोटिसा बजावल्या आहेत. - हेमंत पाटील, उपविभागीय अधिकारी, गिरणा पाटबंधारे, चाळीसगाव, गणपूर (ता. चोपडा) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com