ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी पूर्ण 

यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने ब्राझीलमध्ये सोमवारपर्यंत (ता. २२) सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्याचे पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी अधिक आहे.
86% soybean sowing completed in Brazil
86% soybean sowing completed in Brazil

पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने ब्राझीलमध्ये सोमवारपर्यंत (ता. २२) सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्याचे पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी अधिक आहे. मात्र दक्षिण भागात पाऊस कमी असल्याने मका पिकाला फटका बसत आहे. त्यातच पुढील काळात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी सोयाबीन पेरणी उरकण्याला प्राधान्य देत आहेत, असे येथील एका संस्थेने म्हटले आहे.  जागतिक पातळीवर २०२०-२१च्या हंगामात ब्राझील सोयाबीन उत्पादनात पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर अमेरिका, अर्जेंटिना, चीन आणि नंतर भारताचा नंबर लागतो. ब्राझीलच्या कोनाब या सरकारी संस्थेने यंदा १४२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगाम २०२०-२१मध्ये येथे १३७३ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात ८.४ टक्के म्हणजेच ४७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर यंदा सोयाबीन लागवडीत साडेतीन टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा येथे ४०२ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक फुलण्याची शक्यता असून, उत्पादकता ३५२६ किलो प्रति हेक्टर राहण्याचा अंदाज आहे.  यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने येथे सोयाबीन पेरणीने वेग घेतला आहे. आतापर्यंत येथे ८६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ब्राझीलमधील रिओ ग्रॅंडे डोसूल या राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्या पेरणी जोरात सुरू आहे. तसेच रिओ ग्रॅंडे डोसूल राज्यात नुकत्याच झालेल्या पावसाने सोयाबीनसह मका पिकालाही दिलासा मिळाला. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात लागवड झालेल्या सोयाबीन आणि मका पिकांचे नुकसान होत असल्याचे वृत्त आहे. 

कीड-रोगांचा प्रादुर्भाव  ब्राझीलमधील पराना राज्य आणि लागून असलेल्या पराग्वे देशात सोयाबीन पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त येथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. हा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवर असल्याने यावर नियंत्रण शक्य असल्याचे येथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सूचना देऊन नियंत्रणाचे उपाय सुचविले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com