पाण्यासाठी ९ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

पाण्यासाठी ९ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
पाण्यासाठी ९ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

यवतमाळ : लोअर पूस धरणातील पाणी शेतीसाठी उपलब्ध करावे, कालव्याच्या माध्यमातून होणारी गळती थांबवावी, यासाठी नऊ गावांतील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महागाव तालुक्‍यातील गावांचा यात समावेश आहे. 

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांनी १९९० मध्ये वेणी येथे पूस नदीवर लोअर पूस प्रकल्प उभारण्यात आला. त्याची क्षमता दहा हजार हेक्‍टर सिंचनाची आहे. कालवा शून्य ते ५० किलोमीटर, टेल १२ किलोमीटर असा ६२ किलोमीटर लांबीचा आहे. कालव्याचे काम काळ्या मातीत झाले असल्याने त्याला जागोजागी क्षती पोचली आहे. शिवाय मातीतून पाणी झिरपत असल्यामुळे ते वाया जाते. त्यामुळे दरवर्षी ओलिताचे क्षेत्र कमी होत आहे. 

ईजनी, पोहंडूळ, तिवरंग, चिखली, मलकापूर, भोसा, दहिसावळी, धनोडा, वाघनाथ या लाभक्षेत्रातील ९ गावातील शेतकरी रब्बी हंगामात पिके घेण्यापासून वंचित राहतात. पाण्याची उपलब्धता नसल्याने या भागात आर्थिकसमृध्दी देखील नांदत नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. दरवर्षी जिल्ह्यात १०० टक्‍के भरणारा हा एकमेव प्रकल्प अाहे. तरीही त्यातील पाण्याचा उपयोग मात्र शेतीसाठी १०० टक्‍के होत नाही. 

प्रशासन व लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे वारंवार लक्ष्य वेधण्यात आले. परंतु त्यांच्याकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही, असा आरोप आहे. त्यामुळे या धोरणाचा निषेध म्हणून नऊ गावातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव खडकेकर, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कारावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. 

समितीच्या अध्यक्षपदी खडकेकर

लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पंजाबराव खडकेकर यांची पाणी संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य घालून चार पोकलॅंड मशीन उपलब्ध करून दिल्यास ९ गावांतील शेतीला, पिण्यासाठी, जनावरांना पाणी मिळू शकते, असा विश्‍वास या वेळी व्यक्‍त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com