नरनाळा किल्ला विकासासाठी ९५ कोटींचे नियोजन

‘नरनाळा’ विकासासाठी ९५ कोटींचे नियोजन
‘नरनाळा’ विकासासाठी ९५ कोटींचे नियोजन

अकोला  ः जिल्ह्यातील नरनाळा विकास आराखड्याअंतर्गत नरनाळा किल्ला व परिसराचा विकास करण्यासाठी ९५ कोटी ३० लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे नरनाळा किल्ल्याचा चेहरामोहरा बदलेल, अशी अपेक्षा पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली.  नरनाळा विकास आराखड्यासंदर्भात पुरातत्त्व, पर्यटन वनविभाग, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रशासन विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पुरातत्त्व  विभागाचे मिलिंद अंगाईतकर, पर्यटन विभागाचे हनुमंत हेडे, वनविभागाचे श्री. चौहान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय  खडसे, आयुष गुप्ता यांची उपस्थिती होती. कडू म्हणाले, नरनाळा किल्ल्याची ओळख कायम ठेवून त्याचा ऐतिहासिक वारसा जपून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर देखणा व शोभिवंत परिसर निर्माण करावा.  उन्हाळ्यातसुद्धा नरनाळ्याचा परिसर हिरवागार राहील यासाठी उपाययोजना कराव्यात. मेंढा गेट ते महाकाली गेट व महाकाली गेट ते राणीमहालपर्यंत पर्यंटकासाठी खास अशी पाऊल वाट निर्माण करावी. नरनाळा किल्ल्यासोबत पायथ्याशी असलेल्या शहानूर गावाचाही विकास करावा. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील स्थानिक आदिवासी समाजाचे मूळपण जपून  तेथील घर, रस्ते यांचा विकास करावा.  स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचे खाद्य, वस्त्र, सण व उत्सव तसेच त्यांची संस्कृती जपणारे आदिवासी गाव निर्माण करावे.  कोणत्याही प्रकारचे बाजारीकरण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिलेत. नरनाळा विकास आराखडासाठी ९५ कोटी ३० लाख रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे.  यामध्ये पुरातत्त्व विभागासाठी २३ कोटी, पर्यटन विभागासाठी १८ कोटी,  वनविभागासाठी ६२ लाख व बांधकाम विकासासाठी ३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अकोला शहरातील असदगड किल्ल्यासाठी १३ कोटी ५५ लाख रुपये ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com