तारण साखरेवर आता मिळणार ९० टक्के कर्ज

तारण साखरेवर आता मिळणार ९० टक्के कर्ज
तारण साखरेवर आता मिळणार ९० टक्के कर्ज

पुणे ः तारण साखरेवरील कर्जपुरवठा करताना १५ टक्के दुरावा ठेवून ८५ टक्के रक्कम साखर कारखान्याला देण्याच्या निर्णयात राज्य सहकारी बँकेने बदल करून आता हा दुरावा १५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाने मध्यंतरी साखरेचा दर हा प्रतिक्विंटल २९०० वरून ३१०० रुपये इतका निश्‍चित केला होता. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ झाली असली तरी कमी मागणीमुळे साखर विक्री न होता गोडावूनमध्येच पडून आहे. तसेच शेतकरी ऊस बिल, ऊस तोडणी-वाहतूक बिले आणि कामगारांचे पगार ही देणी मागविण्यासाठी बँकेकडून मालतारण कर्ज घेतले जाते. पूर्वी या कर्जासाठी आवश्यक असणारा दहा टक्के दुरावा वाढवून बँकेने पंधरा टक्के केला होता. उपलब्ध कर्जातून १५ टक्के रक्कम कापली जाऊन कारखान्यांना केवळ ८५ टक्के रक्कम दिली जात होती. त्यामुळे हे खर्च भागवताना अडचणी येत होत्या. या बाबींचा विचार करून राज्य सहकारी बँकेने हंगाम २०१८-१९ मध्ये उत्पादित झालेल्या साखरेवर मालतारण कर्ज देताना हा दुरावा आता १५ वरून १० टक्क्यांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  साखर कारखान्यांना साखर माल तारणापोटी प्रतिक्विंटल साखरेवर ३१०० रुपये इतक्या दरावर १० टक्के दुराव्याने ९० टक्के म्हणजेच प्रतिक्विंटल २७९० रुपये इतकी रक्कम कर्जापोटी उपलब्ध होईल. पंधरा टक्के दुराव्याने ती २६३५ रुपये मिळत होती. या निर्णयाने साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल १५५  रुपये कर्जपुरवठा वाढवून मिळणार आहे. या २७९० रुपयांमधून कारखान्यांच्या येणे कर्जापोटी ५०० रुपये अधिक प्रक्रिया कर्जापोटी २५० रुपये अशी एकूण ७५० रुपये वजावट करून २०४० रुपये इतकी रक्कम कारखान्यांना उपलब्ध होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com