शिराळा तालुक्यात भाताची ९४ टक्के पेरणी

शिराळा तालुक्यात भाताची ९४ टक्के पेरणी
शिराळा तालुक्यात भाताची ९४ टक्के पेरणी

सांगली : शिराळा तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकांची पेरणी ९४ टक्के झाली आहे. याशिवाय भात रोपांची लागण अंतिम टप्प्यात आहे. नाचणी व भुईमूग पेरणी १०० टक्के, तर सोयाबीन पेरणी ९९ टक्के झाली आहे. सध्या परिसरात पावसाची रिमझिम असल्याने पिकांची चांगली वाढ होत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे सर्व साधारण क्षेत्र २५०६७ हेक्टर आहे. शिराळा मंडल क्षेत्रात १२६०५ हेक्टर, तर कोकरूड मंडल क्षेत्रात १०९७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण पेरणी २३५८१ हेक्टर झाली आहे. तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकांचे क्षेत्र १२९६१ हेक्टर आहे. त्यापैकी १२ हजार ८३९  हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. शेतकरी भात पिकांना रासायनिक खतांचा डोस देत आहेत. भात, सोयाबीन, भुईमूग ज्वारी पिकांत आंतरमशागतीची कामे सुरू केली आहेत. पावसामुळे शेतकरी बंधवांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

तालुक्यात भात पिकांची पेरणी धूळवाफेत करण्यात आली आहे. खरीप हंगामातील भात पिकास पावसाने जीवदान मिळाले आहे. रोपांची उगवणही चांगली आहे. वाढ जोमात सुरू आहे. पेरणीसाठी संकरित बियाणे वापरण्यात आले. इंद्रायणी, बासमती, जया कर्जत, जोंधळे, हंसा तेली, रत्‍नागिरी आदी विविध जातींची पेरणी झाली आहे. तालुक्यात पश्‍चिम भागात खरीप हंगामातील भात रोपे, भात चिखलणी लागणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तसेच कोळपण, भांगलणीची कामे सुरू आहेत. 

भाताबरोबर सोयाबीन, भुईमूग जोमात  

खरीप हंगामातील भात पिकांची धूळवाफेतील पेरणी पूर्ण झाली आहे. भात उगवण चांगली झाली आहे. मात्र मध्यंतरी पाऊस नसल्याने भात पिकांची वाढ खुंटली होती. तुरळक पाऊस सुरू झाल्यामुळे आता खरीप हंगामातील भाताबरोबर सोयाबीन, भुईमूग पिकांची वाढ चांगली आहे. 

पाणीसाठा वाढला

गेल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे धरणातील व पाझर तलावातील पाणीसाठा वाढ झाली. करमजाई व अंत्री धरणे भरली आहेत. सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. तालुक्यात ४९ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चांदोली धरणात २०.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ५०.३५ टक्के भरले आहे. मोरणा धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. शिवणी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पावसाचा जोर कायम राहिला, तर या वर्षी भात पिकांचे उत्पन्न वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com