पुणे विभागात रब्बी ज्वारीचे साडेदहा लाख हेक्टर क्षेत्र नापेर

रब्बी ज्वारीचे साडेदहा लाख हेक्टर क्षेत्र नापेर
रब्बी ज्वारीचे साडेदहा लाख हेक्टर क्षेत्र नापेर

पुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना चांगलाच फटका बसला आहे. रब्बी हंगामात पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत ज्वारीचे सुमारे दहा लाख ३४ हजार २३४ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.  

पावसाळ्याच्या चार महिन्यांत पुणे विभागात अत्यंत कमी पाऊस पडला. काही तालुक्यांत पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे परतीच्या पावसावर शेतकरी काही प्रमाणात अवलंबून होते. मात्र, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल होऊ शकली नाही.

पुणे विभागात रब्बी ज्वारीचे सुमारे १३ लाख ५ हजार ४०७ हेक्टरपैकी अवघ्या दोन लाख ७१ हजार १७३ हेक्टर म्हणजेच २१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पाण्याच्या सुविधा असलेल्या ठिकाणी ज्वारीचे पिके वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, अशा ठिकाणी पिके सुकत असल्याचे चित्र आहे. त्याचा मोठा फटका उत्पादनावर होण्याचा अंदाज आहे.

ज्वारीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या अत्यंत कमी पेरण्या झाल्या आहेत. ज्वारीचे जिल्ह्यात सरासरी पाच लाख ८८ हजार ४०७ हेक्टरपैकी एक लाख ७ हजार ८९७ हेक्टर म्हणजेच अवघे १८ टक्के पेरणी झाली आहे. तर, चार लाख ८० हजार ८०१ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिले आहे.

यंदा उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळ, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांत ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्टरपैकी अवघे ३७ हजार ४२३ हेक्टर म्हणजेच १५ टक्के पेरणी झाली आहे.

पावसाअभावी बारामती, इंदापूर, शिरूर, पुंरदर, खेड तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात ज्वारीचे दोन लाख ९ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नेवासा, कर्जत, नगर, पारनेर, श्रीगोंदा ही तालुके रब्बी ज्वारीचे तालुके ओळखली जातात. यंदा या तालुक्यात पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पेरणी होऊ शकली नाही.

जिल्हानिहाय रब्बी ज्वारीचे पेरणी न झालेले क्षेत्र, हेक्टरमध्ये
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र पेरणी न झालेले क्षेत्र
नगर  ४,६९,७८५ १,२५,८५३ ३,४३,९३२
पुणे २,४६,९२४ ३७,४२३ २,०९,५०१
सोलापूर ५,८८,६९८ १,०७,८९७ ४,८०,८०१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com