मॉन्सून हंगामात देशात ९१ टक्के पाऊस : हवामान विभाग

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग)
जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग)

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) देशात सरासरी ८०४ मिलिमीटर म्हणजेच ९१ टक्के पाऊस पडला आहे, तर महाराष्ट्रात या चार महिन्यांत ९२५.८ मिलिमीटर (९२ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागात पावसाने सर्वाधिक ओढ दिली असून, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे. मात्र, जिल्हानिहाय पावसाचा विचार करता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.  देशभरातील पावसाचे वितरण पाहता ईशान्य भारतात माॅन्सूनने मोठी ओढ दिली असून, तेथे ७६ टक्के पाऊस पडला आहे. ईशान्य भारताचा भाग हा मोठे पूर येणारा भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदाच्या हंगामात पावसाचे हे स्वरूप दिसले नाही. १९०१ ते २०१७ या कालावधीतील मॉन्सूनचा विचार करता ईशान्य भारतात अशा प्रकारे पावसाने ओढ देण्याचे प्रमाण कमी आहे. यापूर्वी १९९२, २००५, २००९ आणि २०१३ मध्ये या भागात २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला होता, तर वायव्य भारत (९८ टक्के), मध्य भारत (९३ टक्के), दक्षिण भारतातील (९८ टक्के) राज्यांमध्ये मोसमी पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात देशामध्ये ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, प्रत्येक्षात देशात ९१ टक्के पाऊस पडला आहे, तर ईशान्य भारत वगळता इतर विभागातील पावसाच्या शक्यतेचा अंदाज अगदी बरोबर आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

दिवसागणिक बदलली हंगामाची वैशिष्ट्ये  २०१८ च्या माॅन्सून हंगामाची वैशिष्ट्यांमध्ये दिवसागणिक बदल दिसून आले. केरळमध्ये आलेला पूर, बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणावर तयार झालेली कमी दाबाची क्षेत्र, त्यांची पश्‍चिमेकडे झालेली वाटचाल ही याची काही उदाहरणे आहेत. चार महिन्यांच्या काळात बंगालच्या उपसागरात एकूण १० कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचे एका चक्रीवादळ, १ कमी तीव्रतेचे वादळ (डीप डीप्रेशन) आणि ४ तीव्र कमी दाब क्षेत्रांमध्ये (डीप्रेशन) मध्ये रूपांतर झाले. प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या अल- निनो स्थितीचा यंदाच्या मॉन्सून हंगामावर कोणताही परिणाम झाला नाही.  देशात खरीप लागवड क्षेत्र, धरणांची पाणीपातळी वाढली मॉन्सूनच्या हंगामात पडणारा पाऊस कृषी आणि इतर संलग्न विभागावर प्रभाव पाडतो; तसेच देशभरातील धरणांच्या पाणीपातळीवरही परिणाम होतो. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी (२०१७) विक्रमी क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. मात्र, यंदा गतवर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात २.६ टक्के वाढ झाली आहे. जमिनीत चांगली आर्द्रता असल्याने उत्तर भारतात रब्बी हंगामात चांगली लागवड होईल. केंद्रीय पाणी आयोगाच्या अहवालानुसार देशातील धरणांची पाणीपातळी मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ५ टक्के अधिक, तर गतवर्षीच्या तुलनेत १७ टक्के अधिक असल्याचेही हवामान विभागाने नमूद केले आहे. 

राज्यातील १३ जिल्ह्यांत अपुरा पाऊस हवामान विभागाकडील नोंदीनुसार राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस (८० टक्क्यांपेक्षा कमी) पडला आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, तर पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा या जिल्ह्यांत पावसाने ओढ दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली असून, तेथे हंगामातील सरासरीच्या तुलनेत अवघा ५९ टक्के पाऊस पडला आहे, तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

माॅन्सून अंदाज एक दृष्टिक्षेप मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशातील मुख्य चार विभागातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता. यात आठ टक्के कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली होती. यंदाच्या हंगामातील अंदाज आणि प्रत्यक्ष पडेलेला पाऊस (टक्केवारीमध्ये)  

विभाग अंदाज प्रत्यक्ष पाऊस तफावत
वायव्य १०० ९८ -२
मध्य ९९ ९३ -६
दक्षिण ९५ ९८ +३
पूर्व-ईशान्य ९३ ७६ -१७
भारत ९७ ९१ -६

माॅन्सून हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत - हवामान विभाग)

विभाग सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी
कोकण २९१४.७ २८८३.४ ९९
मध्य महाराष्ट्र ७२९.३ ६६५.४ ९१
मराठवाडा ६८२.९ ५३४.६ ७८
विदर्भ ९५४.६ ८७५.४ ९२
महाराष्ट्र १००७.३ ९२५.८ ९२

राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (स्रोत - हवामान विभाग) 

जिल्हा सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी
कोकण      
पालघर २४२०.२ २३९०.१ ९९
रायगड ३११७.७ ३०७८.५ ९९
रत्नागिरी ३२६१.५ ३३१०.६ १०२
सिंधुदुर्ग ३०२१.८ ३०५६.२ १०१
ठाणे २४३४.१ २५४२.१ १०४
मध्य महाराष्ट्र      
नगर ४३७.६ ३३९.९ ७८
धुळे ५२३.५ ४११.३ ७९
जळगाव ६४१.८ ५१२.२ ८०
कोल्हापूर १७३७.६ १७३१.९ १००
नंदुरबार ८२८.४ ५६३.७ ६८
नाशिक ९१२.२ ९०८.३ १००
पुणे ८६१.० ९९८.१ ११६
सांगली ५०८.१ ३५४.५ ७०
सातारा ७२३.८ ७६३.९ १०६
सोलापूर ४७४.२ २७९.४ ५९
मराठवाडा      
औरंगाबाद ५९४.२ ४०८.० ६९
बीड ५६९.४ ३८३.३ ६७
हिंगोली ८४९.१ ६९८.६ ८२
जालना ६०६.४ ४२८.८ ७१
लातूर ७५२.५ ५२९.२ ७०
उस्मानाबाद ६२३.४ ४७८.८ ७७
नांदेड ८१६.४ ८२२.६ १०१
परभणी ७५७.२ ५९२.१ ७८
विदर्भ      
अकोला ७०२.३ ७०३.९ १००
अमरावती ७८६.६ ६३३.८ ८१
भंडारा ११३७.२ १०२०.७ ९०
बुलडाणा ६४६.६ ४७१.९ ७३
चंद्रपूर ११३१.८ १०८२.२ ९६
गडचिरोली १३०३.० १२९४.८ ९९
गोंदिया १२२८.८ ११२१.९ ९१
नागपूर ९२३.६ ९७५.२ १०६
वर्धा ८८०.३ ७२५.२ ८२
वाशीम ८२५.६ ८०४.४ ९७
यवतमाळ ८५५.० ७१५.८ ८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com