आंबेओहोळ धरणग्रस्तांचा मोर्चा

आंबेओहोळ धरणग्रस्तांचा मोर्चा
आंबेओहोळ धरणग्रस्तांचा मोर्चा

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी  येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, संकलन रजिस्टरवाचन व दुरुस्तीसाठी २९ मे रोजी कॅम्प घेण्याची ग्वाही प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी आंदोलकांना दिली. 

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 'आधी पुनर्वसन मग धरण', 'पुनर्वसनातील दलालगिरी बंद करा', 'जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची' आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई यांनी प्रांत कार्यालयासमोर आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत भूमिका मांडली. 

देसाई म्हणाले, "प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनीचे संकलन रजिस्टर अद्ययावत असणे आवश्‍यक आहे. एकाही गावचे संकलन रजिस्टर झालेले नाही. दुरुस्ती ठप्प आहे. यामुळे प्रशासनाने आधी संकलन रजिस्टर अंतिम करावी. लाभक्षेत्रात १५०० हेक्‍टर जमीन उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगते. आता प्रत्यक्षात जमीन उपलब्ध नाही, तर या जमिनी गेल्या कुठे असा प्रश्‍न आहे. "

"काही प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा कब्जा दिला, पण कसण्यासाठी अडथळा केला जातोय. पर्याय म्हणून पॅकेज देण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, पॅकेजच्या दरात प्रचंड विषमता आहे. प्रकल्प कामासाठी जमीन वापरली, त्याचे भाडे नाही. स्वेच्छा रक्कम दिली, तीसुद्धा अगदी जुजबी आहे. त्याचे धोरण ठरवायला हवे. जगद्‌गुरूंच्या जमिनीबाबत हायकोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. हा प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. या सर्वांची उत्तरे प्रशासनाकडून मिळायला हवीत. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू,'' असेही देसाई यांनी सांगितले. 

संपत देसाई, शंकर पावले, सचिन पावले आदींनी चर्चेत भाग घेतला. अमोल बांबरे, प्रकाश मोरसकर, डॉ. नवनाथ शिंदे, शिवाजी येजरे, अनिल येजरे, मधुकर पोटे, संजय येजरे, गजानन पोवार, सागर सरोळकर, महादेव खाडे आदी उपस्थित होते.दरम्यान, प्रांताधिकारी पांगारकर यांनी आपल्या कक्षात काही प्रमुख आंदोलकांची बैठक घेतली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com