द्राक्षाचा ‘आरा-३२’ वाण देशात दाखल

AARA-32 variety
AARA-32 variety

नाशिक: प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम उत्पादन आणि गोड चवीसाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिद्ध आहे. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी (ता. १९) या वाणाच्या कलम काड्या आणण्यात आल्या आहेत. ‘सह्याद्री’ने यापूर्वी आयात केलेल्या द्राक्षाच्या ‘आरा-१५’ वाणाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर ‘आरा ३२’ हे पुढचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादकांना मागील अनेक वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. ‘आरा’सारखे जागतिक दर्जाचे वाण अशा प्रतिकूल हवामानातही खात्रीशीर दर्जेदार उत्पादन देतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री’ने या वाणांची आयात करून द्राक्ष उत्पादकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्यातक्षम ‘आरा’ या जागतिक वाणाचे सर्वाधिकार ‘सह्याद्री’सारख्या देशातल्या आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील द्राक्ष बागायतदारांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. कॅलिफोर्नियातील  सुप्रसिद्ध ‘आरा’ द्राक्ष वाणांच्या श्रेणीचे भारतातील उत्पादन आणि विक्रीचे सर्वाधिकार सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत. शेतकऱ्यांसाठी परदेशातून पेटंटेड द्राक्ष वाण आयात करणारी ‘सह्याद्री फार्म’ ही देशातील पहिलीच कंपनी ठरली आहे. सहा खंडांमधील २४ देशांत ‘आरा’ द्राक्ष वाणांची लागवड आहे. भारतातील द्राक्ष बागायतदारांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यास ‘आरा’ वाणांमुळे फायदा होणार आहे.       पेटंटेड ‘आरा’ टेबल ग्रेप्सच्या (खाण्याची द्राक्षे) हिरवा, लाल आणि काळा या तीन रंगात एकाहून एक सरस निर्यातक्षम वाण आहेत. ‘आरा’ वाणांमुळे आगामी काळात राज्य आणि अर्थातच ‘ग्रेप कॅपिटल’ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रात क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत. सह्याद्रीने या आधी आयात केलेल्या पेटंटेड आरा १५ या वाणाच्या प्रक्षेत्र चाचणीनंतर बागायतदारांच्या शेतात ४० हेक्टरवर यशस्वी लागवड झाली आहे. २०२० पर्यंत सह्याद्री ‘आरा’चे सर्व वाण लागवडीसाठी बागायतदारांना उपलब्ध करून देणार आहे. २०२३ पर्यंत लागवडीखालील क्षेत्र २ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. ‘आरा’चे सर्व वाण उपलब्ध होणार जगभर लोकप्रिय असलेल्या ‘आरा’ वाण देशातील बागायतदारांना फायदेशीर ठरणार आहेत. ‘सह्याद्री’च्या माध्यमातून हिरव्या द्राक्षांमध्ये आरा १५, ३०, ८ ए-१९+४, लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये आरा १३, १९, २८, २९ आणि काळा रंगाच्या द्राक्षांत आरा २७, ३२, ए१४ हे वाण पुढील सहा महिन्यांत भारतात लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत. आरा-३२ वाणाची वैशिष्ट्ये 

  •  निसर्गत: गोड चव.
  •  साखर-ॲसिडचे उत्तम संतुलन (१८ ब्रीक्स)
  •  संजीवकांची अत्यल्प आवश्यकता. उत्पादन खर्च कमी.
  •  मणी धारणक्षमता चांगली.
  •  मण्याचा आकार २४ ते २६ मि.मी.
  •  घड संख्या ४० ते ४२.
  •  मोठा व टिकाऊ घड.
  •  पावसाला व प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम.
  •  उष्णकटिबंधीय तसेच वाळवंटी प्रदेशातही योग्य.
  •  हेक्टरी ३६ टनापर्यंत उत्पादकता.
  •  काळ्या रंगाचा वाण, अत्यंत आकर्षक व टिकाऊ रंग.
  •  खाण्यास कुरकुरीत व भरपूर गर, गोड रसाळ चव.
  •  निर्यातीसाठी सर्वोत्तम.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com