येवल्यातून तब्बल तीन हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात

दुष्काळी येवल्यातून तब्बल तीन हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात
दुष्काळी येवल्यातून तब्बल तीन हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात

येवला : ज्या तालुक्याचा उन्हाळा टॅंकरने पाणीपुरवठाशिवाय जात नाही, अशा दुष्काळी तालुक्यातून परदेशात द्राक्ष निर्यात झाली, असे सांगितल्यास नवल वाटेल. पण, येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करत यंदा निसर्गालाही शरण आणत तब्बल तीन हजार मेट्रिक टन द्राक्ष परदेशात पाठविली आहेत. बेमोसमी पाऊस अन् लहरी हवामानामुळे यंदा द्राक्ष बागा निघणार की नाही याची शाश्वती नव्हती पण या संकटावर मात करून द्राक्ष निर्यात केल्याने येथील शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतोय. विशेष म्हणजे यंदा द्राक्षांना ९५ ते १०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला असून, अजूनही काही प्रमाणात द्राक्ष निर्यात होऊ शकणार आहे. राज्यातील टंचाईग्रस्त असलेल्या ९४ तालुक्यांच्या यादीत आजही येवल्याचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. तरीही ठिबक, शेततळ्यासह अनेक पर्याय शोधून येथील शेतकऱ्यांनी शेतीला बागायती केले. येथील शेतकरी प्रयोगशील असल्याने स्वस्थ बसत नाहीत, म्हणूनच टंचाईच्या झळांना न जुमानता परदेशातही दुष्काळी मातीतील पिकांचा सुगंध दरवळत आहेत, हे विशेष! कांदा आणि मकाचे आगार असलेल्या येवल्याच्या शेतीत अनेक नवनवीन प्रयोग झाले. बांबू, बोनेट अन् शिमला मिरची, केसर आंबा, हळद यापासून शेवग्यापर्यंत पिकाचे प्रयोग शेतकऱ्यांनी केले. पण कांद्याची गोडी इतर पिकांना आली नसल्याचा अनुभव आहे. त्यातच येवल्यात द्राक्ष पिकतात का? असा प्रश्न अनेक जण करतात. मात्र, अल्पशा पाण्यावर आणि प्रतिकूल हवामानातही येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष शेती पिकवून दरवर्षी द्राक्ष निर्यात करून सर्वांना अचंबित केले आहे. सततचा पाऊस, द्राक्ष बागात गुडगाभर साचलेले पाणी, रोगाचा प्रादुर्भाव आणि फवारणी वर फवारण्याची वेळ.. अशी संकटाची वेळ आलेली असतानाही शेतकऱ्यांनी हिंमत न हरता निर्यातक्षम बागा फुलविल्या. कृषी विभागाच्या सल्ल्याने त्याची निगाही राखली..याचमुळे नेदरलँड, जर्मनी, युके, डेनमार्क, रशिया, चीन आदी देशांमध्ये येथील द्राक्ष पोचली असून तेथे भाव खात आहेत. तालुक्‍यातील तब्बल ३७५ शेतकऱ्यांनी यावर्षी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. तब्बल २०५ हेक्टरमध्ये निर्यातक्षम द्राक्षाचे पीक घेतले असून आत्तापर्यंत २०० शेतकऱ्यांनी ११० हेक्टरमधील द्राक्ष निर्यात केली आहे. यात गेल्या वर्षाचे सुमारे १४७ शेतकरी असून यंदा प्रथमच निर्यात करणारे ५३ शेतकरी आहेत. आत्तापर्यंत २ हजार ७७१ मेट्रिक टन द्राक्षे परदेशात पोचली असून सरासरी ९५ ते १०० रुपयाचा प्रतिकिलोला भाव मिळाल्याने आत्तापर्यंत २७ कोटी रुपयांचे परकीय चलन येवलेकरांना मिळाले आहे. विजय वावधने (देशमाने) सचिन बुल्हे (वळदगाव), श्रीधर कदम, अरविंद बोराडे (मुखेड), यशोदाबाई बोरणारे (पाटोदा), पोपट कदम (निळखेडे),भैरव कदम (सोमठाणदेश), पोपट शेळके (मानोरी), गणपत भवर (ठाणगाव), देविदास कदम (सोमठाणदेश) आदी शेतकऱ्यांनी मेहनतीने थॉमसन, क्लोन २, सोनाका, शरद सीडलेस, क्रीम सन आदी जातींची द्राक्ष निगा राखत निर्यातक्षम उत्पादनात ठसा उमटवला आहे. वर्षनिहाय झालेली द्राक्ष निर्यात (आकडेवारी ः मेट्रिक टनमध्ये) 

२०१५ ४००
२०१६ १८००  
२०१७ २८७३  
२०१८ २८०० 
२०१९ ३७८६  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com