About the water of 'Vishnupuri' Order to take action
About the water of 'Vishnupuri' Order to take action

‘विष्णुपुरी’च्या पाण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश

नांदेड : ‘‘विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाच पाणी पाळ्या सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.’’

नांदेड : ‘‘विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाच पाणी पाळ्या सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी’’, अशी सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाने जलसंपदा सचिवांना केली, अशी माहिती मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे यांनी दिली.  

जलसंपदा विभागाने विष्णुपुरी प्रकल्प, अंतेश्वर बंधारा व दिग्रस बंधारा असे तीन प्रकल्पाचे पाणी असूनही तीन पाणी पाळ्यांचे नियोजन केले होते. परंतु, तीन पाण्यावर खडकाळ जमिनीवरील रब्बी गहू व ज्वारी येऊ शकत नाही. म्हणून प्रा. शिवाजी मोरे यांनी ही बाब राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. गोदावरी नदीवरील तिन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

नांदेड शहरवासीयांना पिण्यासाठी ३५ दलघमी पाणी, तर उर्वरित १४४ दलघमी पाणी शेतीसाठी असे पाणी या तिन्ही प्रकल्पात उपलब्ध आहे. त्यापैकी फक्त तीन पाणी पाळ्या जाहीर करून १७ दलघमी पाण्याचाच उपयोग कालव्यांसाठी होत आहे. उर्वरित १०४ दलघमी पाणी कुठे मुरतेय, असा प्रश्न उपस्थित करून रब्बी पिकांसाठी कमीत कमी पाच पाणी पाळ्या कालव्यांना द्याव्यात, अशी मागणी प्रा. शिवाजी मोरे यांनी केली होती. 

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दोन्ही पाणी पाळ्यावर गहू, ज्वारी, ऊस असे पीक घेतले आहेत. ‘विष्णुपुरी’चे एकूण लाभक्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. लाभक्षेत्रात खडकाळ व उंचीवर जमीन असल्यामुळे गहू व ज्वारी या पिकांसाठी ५ पाणी पाळ्या लागतात. पहिल्या पाणी पाळीला सात दलघमी पाणी लागते. नंतरच्या प्रत्येक पाणी पाळीला पाच दलघमी पाणी लागते, असे एकूण पाच पाणी पाळ्याला २७ दलघमी पाणी लागते. परंतु, प्रशासनाने १७ दलघमी पाणी देऊन लाभार्थी शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. 

११ टीएमसी पाणी मान्य 

राष्ट्रीय जल आयोगाने ११ टीएमसी पाणी विष्णुपुरी खोऱ्यांना मान्य केले आहे. तरी पाच पाणी पाळ्या द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती, याची दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाने विष्णुपुरीच्या पाण्यासंदर्भात जलसंपदा सचिवांना योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना केल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या पाच पाळ्या मिळतील, अशी आशा आहे. - प्रा. शिवाजी मोरे, मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com