सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर निर्यात वाढणार 

भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले नाही, तरी यंदा ७० लाख टन साखर भारताकडून निर्यात होण्याची शक्यता आहे.
In the absence of government grants Sugar exports will increase this year
In the absence of government grants Sugar exports will increase this year

पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले नाही, तरी यंदा ७० लाख टन साखर भारताकडून निर्यात होण्याची शक्यता आहे, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जागतिक साखर परिषदेसमोर मांडले.  लंडनमध्ये अलीकडेच झालेल्या या चारदिवसीय परिषदेत केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोध सिंग व गायकवाड यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. परिषदेतून परतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना भारताच्या भूमिकेबद्दल तसेच परिषदेच्या कामकाजाविषयी साखर आयुक्तांनी माहिती दिली.  ‘‘भारत यंदा चांगल्या प्रमाणात साखर निर्यात करणार आहे. आतापर्यंत कच्च्या साखरेचे ३० लाख टनाचे करार झाले आहेत. याशिवाय ४५० कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीच्या निविदादेखील निघालेल्या आहेत,’’ असे भारताने स्वतःहून या परिषदेत स्पष्ट केले. परिषदेत पहिल्या दोन दिवसात जागतिक दर्जावरील पिकांच्या व्यापाराचा आढावा घेण्यात आला.  जगात सोयाबीन, गव्हाखालोखाल सर्वाधिक व्यापार साखरेचा होतो. इथेनॉल मिश्रणाबाबत जागतिक पातळीवर होत असलेल्या धोरणात्मक बाबींचे बारकावेदेखील या वेळी उलगडून सांगण्यात आले. साखर व इथेनॉलनिर्मितीत आता भारत एक मोठी ताकद होत असल्याने इतर देशांच्या नजरा भारताच्या भूमिकवर खिळलेल्या आहेत.  साखर आयुक्त म्हणाले, ‘‘ब्राझील, पाकिस्तान, थायलंड व इतर जागतिक पातळीवरील साखर उत्पादक देशांकडून भारतीय साखर धोरणावर घेतले जात असलेले आक्षेप किंवा मागण्या अजूनही कायम आहेत. विशेषतः भारत सरकारने निर्यातीला अनुदान देऊ नये, अशी या देशांची मागणी आहे. या शिवाय आम्हाला भारतात मळीची निर्यात करू द्यावी, अशी मागणीही साखर उत्पादक देशांची आहे. भारताने सध्या साखरेच्या आयातीवर १०० टक्के सीमा शुल्क लावलेले आहे. ते कमी करण्याचा तगादा या देशानी लावलेला आहे.’’ 

इथेनॉलची चर्चा  इंधनाबाबत इलेक्ट्रिक आणि इथेनॉल, अशा दोन्ही गटांत सुरू असलेल्या हालचाली व स्पर्धेचीही चर्चा झाली. युरोपने आता इथेनॉलकडे लक्ष द्यायला हवे, असा आग्रह या वेळी धरला गेला. इथेनॉलमुळे आता जगाच्या वाटचालीत ऊस हे एक ‘गेमचेंजर’ म्हणजेच डाव पलटविण्याची क्षमता असलेले पीक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण नैसर्गिक वायूपासून आतापर्यंत मिळणाऱ्या सर्व बाबी उदाहरणार्थ, पांढरे घासलेट, पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन आता ऊस, शर्कराकंद आणि अन्नधान्यापासून मिळण्याची मोठी शक्यता तयार झालेली आहे. त्यामुळे उसाचे महत्त्व यापुढे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे सूतोवाच आयुक्त गायकवाड यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com