हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
खानदेशात जलसाठा मुबलक
खानदेशात विविध प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे टंचाई यंदा कमी असणार आहे. तसेच पाण्याचे तिसरे आवर्तनही मिळेल, असे निश्चित मानले जात आहे.
जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे टंचाई यंदा कमी असणार आहे. तसेच पाण्याचे तिसरे आवर्तनही मिळेल, असे निश्चित मानले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातून दोनदा, गिरणातून दोनदा सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच नदीकाठची गावे, विविध पालिका, प्रकल्पांसाठी देखील या धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. गिरणा धरणावर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव येथील पाणी योजनांचे स्त्रोत अवलंबून आहेत. तसेच शंभर गावांमधील टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच कानळदा, नांद्रा बुदूकपर्यंत (ता. जळगाव) पाणी सोडावे लागते. हतनूर धरणावर भुसावळ, साकेगाव येथील पाणी योजनांचे स्त्रोत अवलंबून आहेत. तसेच आयुध निर्माणी, दीपनगर (ता. भुसावळ) येथील विद्युत प्रकल्पासाठी देखील या धरणातून पाणी सोडावे लागते. यापूर्वी रब्बीसाठी दोनदा आवर्तने प्रकल्पातून सोडलेली आहेत. तरीही सध्या ५६ टक्क्यांवर जलसाठा आहे.
गिरणा धरणातील साठाही ५८ टक्क्यांवर आहे. वाघूर धरणातून रब्बीसाठी दोनदा आवर्तन सोडले आहे. काही गावांमध्ये मात्र पाणी प्रकल्पाच्या बांधकामाच्या अडचणीमुळे सोडले नाही. वाघूर धरणाच्या माध्यमातून जळगाव, भुसावळला पाणीपुरवठा केला जातो. तसेच पाइप कारखान्यासाठीदेखील पाणी सोडले जाते. हतनूर व गिरणातून या महिन्याच्या अखेरीस रब्बीसाठी तिसरे आवर्तन सोडले जाईल. तसेच पाणी योजनांसाठीदेखील नदीत पाणी सोडले जाणार आहे.
धुळ्यातील अनेर प्रकल्पातील जलसाठाही ५७ टक्क्यांवर आहे. यातूनही रब्बीसाठी दोनदा आवर्तन सोडले असून, तिसरे आवर्तन सोडले जाईल. तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग, बाजरीसाठीदेखील पाणी सोडले जाईल. पांझरा प्रकल्पातूनही रब्बीसाठी एक आवर्तन सोडले जाणार आहे. या प्रकल्पातही सुमारे ५७ टक्के जलसाठा असल्याची माहिती मिळाली.
इतर मध्यम प्रकल्पांमध्येही खानदेशात मुबलक जलसाठा आहे. त्यात धुळ्यातील अमरावती, सोनवद, मालनगाव, बुराई या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच नंदुरबारमधील दरा, सुसरी प्रकल्पातही मुबलक पाणी आहे. खानदेशातील प्रकल्पांमधील जलसाठा एकूण ५३ टक्क्यांवर आहे. उन्हाळ्याचे तीन महिने राहिले आहेत. या स्थितीत पाणी मुबलक असल्याचे सांगण्यात येत आहे.
- 1 of 1099
- ››