चार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’, अशी एक म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.
ताज्या घडामोडी
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गती
आगामी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवडीस प्राधान्य देऊ लागले आहेत. महाबीजने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ३०० हेक्टरवर अशा प्रकारच्या लागवडीचे नियोजन आहे.
अकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस झालेल्या पावसामुळे मालाचा दर्जा घसरला. अनेकांना उत्पादनही पुरेसे झालेले नाही. बीजोत्पादन कार्यक्रमालाही फटका बसला. त्यामुळे आगामी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवडीस प्राधान्य देऊ लागले आहेत. महाबीजने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ३०० हेक्टरवर अशा प्रकारच्या लागवडीचे नियोजन केले आहे. या साठी बियाणे वितरित केले जात आहे.
गेल्या खरीप हंगामात पीक काढणीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. परिणामी सोयाबीनसारखे पीक काळवंडले. अनेकांना तर एकरी क्विंटल, दोन क्विंटल उत्पादन झाले. कंपन्यांच्या बीजोत्पादन कार्यक्रमावरही परिणाम झालेला आहे. यामुळे यंदा वाशीमसारख्या बाजारात उत्कृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाण्यासाठी सातत्याने वाढीव दराने विकल्या जात आहे. अनेक कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी वाढवलेली आहे. कृषी यंत्रणा शेतकऱ्यांना घरचे बियाणे साठवून ठेवण्याचे सातत्याने आवाहन करीत आहे.
दुसरीकडे आता उन्हाळ्यात सोयाबीन लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. महाबीजने अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचे ३०० हेक्टरचे क्षेत्र निश्चित केले आहे. जेएस ३३५ व ९३०५ या सुधारित वाणांचे पायाभूत बियाणे बीजोत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे.
सध्या या विभागात प्रत्येक तालुक्यात अशा लागवडीसाठी शेतकऱ्यांना समाज माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. लागवडीनंतर महाबीजचे तंत्रज्ञ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतांना भेटी देऊन मार्गदर्शनही करणार आहेत.
मुगाचीही लागवड
महाबीजने १०० हेक्टरवर उन्हाळी मुगाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. या वर्षात जिल्ह्यात मुगाचे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे बियाणे निर्माण करण्याच्या उद्देशाने मुगाचे बीजोत्पादन केले जाणार आहे.
प्रतिक्रिया
उन्हाळ्यात बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. या बाबत कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने कृती कार्यक्रम निश्चित केलेला आहे. उन्हाळयात लागवड होत असल्याने पुढील हंगामासाठी चांगल्या उगवण क्षमतेचे बियाणे तयार होईल. या दृष्टीने महाबीजने ३०० हेक्टरवर सोयाबीन आणि १०० हेक्टरवर मूग पिकाचे नियोजन केले आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
-जगदीशसिंग खोकड, विभागीय व्यवस्थापक, महाबीज, अकोला
- 1 of 1062
- ››