ऊस आणि साखर हंगाम नियोजनात अचूकता येणार

साखर हंगाम
साखर हंगाम

कोल्हापूर ः ऊस पिकाखालील क्षेत्र, उसाची उत्पादकता, उसाचे उत्पन्न, साखरेचे उत्पन्न, उभ्या उसावरील रोग- किडीची अवस्था याबाबत अचूक निदान करण्याचे उच्च रेझोल्यूशन आधारित अद्यावत तंत्रज्ञान ‘आयबीएम’ या संगणक उद्योगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘द वेदर कंपनी'सोबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या स्तरावरून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. त्याआधारे `हवामान अंदाज सूत्र' निश्चित होण्यात यश आल्यास ते भारतीय ऊस व साखर उद्याेगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.  एल-निनोच्या प्रभावाबाबत भारतीय हवामान खाते व स्कायमेट या खासगी क्षेत्रातील हवामान अंदाज करणाऱ्या संस्थेमध्ये मतभिन्नता आहे. पॅसिफिक क्षेत्रातील हवा, तापमान व एकूण परिस्थितीमध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे ही संभ्रमावस्था निर्माण होत आहे. ‘‘२५ मार्चपर्यंत देशात जवळपास २८८.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक १०३.६० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथे ९०.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. चालू साखर वर्षात देशभरात ३२४ लाख टन साखरेचे उत्पादन होईल,’’ असा अंदाजही श्री नाईकनवरे व्यक्त केला.  देशातील एकूण ५३५ साखर कारखान्यांपैकी ३१३ कारखान्यात आजमितीला गाळप सुरू असून, त्यातून २६६१.६७ लाख टन उसाचे गाळप  झाले आहे. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात ९२५ लाख टन तर उत्तर प्रदेशात ८०२.२१ लाख टन उसाचे गळीत झाले. साखर उत्पादनात तिसरा क्रमांक कर्नाटकाचा असून तेथे ४२.९० लाख टन साखरेची निर्मिती झाली तर गुजरातमध्ये १०.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या दोन्ही राज्यात उसाचे गळीत प्रत्येकी ४०८.५७ लाख टन व ९९.०४ लाख टन झाले आहे.  ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असला तरीही साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तर प्रदेशाने बाजी मारली असून तेथे २५ मार्च पर्यंत उताऱ्याचे प्रमाण ११.३० टक्के आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ११.२० टक्के आहे तर कर्नाटक व गुजरातमध्ये ते अनुक्रमे १०.५० टक्के व १०.४० टक्के असे आहे.  विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या उत्तर प्रदेशात कधीही साखरेचा उतारा १० ते १०.५ टक्क्यांच्‍यावर मिळाला नव्हता त्या राज्यातील सरासरी ११.३० टक्के साखर उतारा नजरेत भरण्यासारखा आहे. या राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकता वाढीकडे विशेष लक्ष पुरविल्याने तसेच सी ओ २३८ जातीच्या उसाखाली जवळपास ७० टक्के क्षेत्र आणल्यानेच ही जादू पाहायला मिळत आहे.  देशभरात साखरेचे उत्पादन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा व उत्तराखंड या राज्यांत प्रामुख्याने होते व या राज्यांमधून सहा महिन्यांत तयार होणाऱ्या साखरेची विक्री मात्र वर्षभर संपूर्ण देशभरात होत असते. मात्र, गतवर्षीच्या व यंदाच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे स्थानिक बाजारातील साखर विक्रीच्या दरावर कायम दबाव टिकून राहिल्याचे दिसते. अंदाजात अचूकता आणण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून हवामानाचा अंदाज चुकत असल्याने याचा परिणाम साखर हंगामावर होत आहे. सध्याच्या प्रचलित यंत्रणांनी वर्तवलेल्या अंदाजावर शेतीचे नियोजन अवलंबून राहते. पण अंदाज अचूक नसल्याने ऊस पीक व अन्य बाबींचा मेळ चुकतो. उत्पादनात अनपेक्षित चढ उतार येतो. शासनालाही धोरण ठरवताना या चुकीच्या अंदाजाचा मोठा फटका बसत आहे. याबाबत मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन ही त्रुटी दूर करण्याकरता राष्ट्रीय संघ साखर संघाने या कंपनीशी सहकार्य घेऊन योग्य अंदाजासाठी काम करण्याचे ठरवले आहे. परदेशांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज हा प्रत्येक पिकासाठी महत्त्वाचा ठरतो हे पाहून संघानेही जागतिक कंपनीशी करार करून अंदाजात अचूकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. हा करार यशस्वी झाल्यास साखर उद्योगांमध्ये एक चांगले वातावरण निर्माण होऊ शकेल असे नाईकनवरे यांनी यावेळी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com