ई-नामप्रकरणी १३ बाजार समित्यांवर कारवाईचे आदेश

ई-नाम
ई-नाम

पुणे ः बाजार समित्यांमधील शेतमालाच्या पारंपरिक विक्री व्यवस्थेमधील शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी, या व्यवस्थेत पारदर्शीपणा आणत शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये हेतुतः टाळाटाळ करणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाईचे आदेश पणन मंडळाने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, सोलापूर, सांगलीसह १३ बाजार समित्यांचा समावेश आहे.  शेतमाल विपणन व्यवस्थेत पारदर्शीपणा आणण्याबरोबरच राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी देशभरात २०१७ मध्ये ई-नाम योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत देशातील ५८५ बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला. तर राज्यात दोन टप्प्यात ६० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला. यासाठी प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांच्या निधीबरोबरच संगणक प्रणाली केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्यशाळा, प्रशिक्षण देण्यात आले. मात्र राज्यातील विविध बाजार समित्यांनी ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली. यासाठी विविध बाजार समित्यांना ५,३,२ आणि १ लाखांचे पारितोषिकदेखील देण्यात आले.  मात्र काही बाजार समित्यांनी अडते आणि व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येत अंमलबजावणी न करण्यासाठी विविध कारणे देत अंमलबजावणी केली नाही. यामध्ये प्रामुख्याने १३ बाजार समित्यांचा समावेश आहे.  कारवाईस पात्र बाजार समित्या औरंगाबाद, भोकर, लातूर, मालेगाव, गोंदिया, जुन्नर, खामगाव, पिंपळगाव, सेनगाव, सोलापूर, कराड, पुणे आणि मुंबई. पुणे, मुंबईत अंमलबजावणी नाही पुणे आणि मुंबई या राज्यातील प्रमुख बाजार समित्या आहेत. या दोन्ही बाजार समित्यांवर राज्य शासन नियुक्त प्रशासक आहेत. मात्र या दोन्ही बाजार समित्यांमध्ये विविध कारणे देत ई-नामची अंमलबजावणी झालेली नाही.  केंद्राचे अधिकारी घेणार झाडाझडती ई-नामच्या अंमलबजावणीबाबत राज्यातील बाजार समित्यांची सोमवारी (ता. ६) केंद्र सरकारचे अधिकारी झाडाझती घेणार आहेत. सोमवारी जिल्हा सहकारी बॅंकेच्या सभागृहात बैठक होणार असून, या बैठकीला केंद्रीय सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यस्थापक दीपक शिंदे, विविध जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक उपस्थित राहणार आहेत. दृष्टिक्षेपात ई-नाममधील व्यवहार 

  • १३५० कोटी रुपयांच्या ५२ लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाइन लिलाव 
  • ४२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा 
  • ११ लाख १५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी 
  • १५ हजार व्यापारी तर १२ हजार ५३६ अडत्यांची नोंदणी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com