एक रुपयाची लाच घेतल्यास भ्रष्ट अधिकाऱ्याची धिंड काढू : तुपकर (Exclusive Video सुद्धा)

भ्रष्ट अधिकाऱ्याची धिंड काढू
भ्रष्ट अधिकाऱ्याची धिंड काढू

पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात धूळ खात पडलेले निविष्ठा परवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तब्बल सात तास ठिय्या आंदोलन करून ताब्यात घेतले आणि चक्क फुकट वाटले. “परवान्यासाठी यापुढे कोणीही लाच देणार नाही. राज्यातील एकाही शेतकरी उद्योजकाकडून एक रुपयाची लाच घेतल्यास त्या अधिकाऱ्याची धिंड काढू,” असा सणसणीत इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला. अभूतपूर्व ठरलेल्या या आंदोलनाचे शेतकरी उद्योजकांसह कृषी खात्यातील चांगल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.  मुंबईत शिवसेनेने काही वर्षांपूर्वी खाद्यतेल टंचाईच्या काळात केलेल्या ‘धारा आंदोलना’सारखेच ‘स्वाभिमानी’चे ‘परवाने आंदोलन’ झाल्याची चर्चा आयुक्तालयात दिवसभर सुरू होती. श्री. तुपकर यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मंगळवारी अचानक कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात दाखल झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. “पैशांसाठी परवाने अडवून ठेवणारी साखळी येथे आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी उद्योजकांचेही परवाने तुम्ही अडवून ठेवलेले आहेत. त्यामुळे सर्व परवाने आजच बाहेर काढा. आताच मोफत या परवान्याचे वाटप करा,’’ अशी रोखठोक भूमिका श्री. तुपकर यांनी घेतली.  काय म्हणाले रविकांत तुपकर पहा Video गुण नियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे यांच्या दालनात दुपारी बारा वाजता श्री. तुपकर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी’ने आपली तोडफोड स्टाइल बाजूला ठेवली. कायद्याचा अभ्यास करून नेमके प्रश्न आयुक्तालयात उपस्थित केल्यामुळे अधिकाऱ्यांची कोंडी झाली. पोलिसांना या आंदोलनाची कुणकुण लागल्यानंतर आंदोलन नसून, बैठक सुरू असल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी दिला.  ‘‘परवाने का पडून आहेत, ते का वाटले जात नाहीत,’’ या प्रश्नांना आयुक्तालयाकडे उत्तरे नव्हती. त्यामुळे सात तास ठिय्या आंदोलन सुरू असतानाही स्वतः आयुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी आंदोलनात हस्तक्षेप केला नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनी धाव घेतल्यामुळे गुण नियंत्रण विभागाची धांदल उडाली. श्री. तुपकर यांनीदेखील कोणाशीही वाद घातला नाही की घोषणाबाजी झाली नाही. ‘कायद्यानुसार वाटले जाणारे परवाने बाहेर काढा; मी लगेच आंदोलन मागे घेतो,’ अशी भूमिका त्यांनी घेतली.  आंदोलनकर्त्या शेतकरी कार्यकर्त्यांसमोर सपशेल माघार घेतलेल्या हतबल प्रशासनाने निविष्ठा परवान्याचे तीन गठ्ठेच संध्याकाळी सात वाजता श्री. तुपकर यांच्या हवाली केले. लाखो रुपये मूल्य असलेल्या या परवान्यांच्या गठ्ठ्यांना श्री. तुपकर यांनी स्वतः रबर लावले व यादीदेखील तपासली. खताचे १८, बियाण्यांचे १८ आणि कीटकनाशकांचे १७ परवाने या वेळी सापडले. अजून ३९ परवाने बाकी असून, तेदेखील उद्याच आमच्या ताब्यात मिळाले पाहिजेत, अशी भूमिका श्री. तुपकर यांनी घेतली. “हे सर्व परवाने कृषी खात्यानेच संबंधित उद्योजकांना द्यावेत. त्यासाठी उद्योजकांना बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात परवाने द्या. आयुक्तालयाने परवान्यांचे वाटप दोन दिवसांत संपवावे. आज आम्ही अतिशय शांततेत आंदोलन केले आहे. उद्योजकांना विनाकारण त्रास देऊ नका. चुकून जरी एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने पैसे मागितल्याचे आमच्या कानावर आले तर आम्ही त्याला उचलून घेऊन जाऊ आणि धिंड काढू,” असा खणखणीत इशारा श्री. तुपकर यांनी दिला. “हा विषय आम्ही रविवारपर्यंत दिवसरात्र काम करून निकालात काढू. सोमवारी सर्व परवाने टपालाने पाठविली जातील,” असे उत्तर गुण नियंत्रण संचालकांनी दिले.  प्रशासन कसे चालते, आमच्याकडे पुरावे “कृषी खात्यात कोण कसे काम करतो आहे याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. प्रशासन कसे चालते आहे याची चांगली कल्पना आम्हाला आहे. त्याचे पुरावेदेखील आहेत. टप्प्याटप्याने आम्ही सर्व माहिती बाहेर काढू. तुम्ही त्याची काळजी करू नका. ५४ परवाने आता तुम्ही बाहेर काढले आहेत. ते परवाने ई-मेलने पाठवा आणि पोस्टानेदेखील पाठवा. आम्ही पुन्हा परवान्याची यादी तपासण्यासाठी येऊ,” असेही तुपकर यांनी बजावले.  मंत्रालयातून दबाव टाकणारे महाभाग कोण ? स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन सुरू होताच गुण नियंत्रण विभागातून तातडीने सूत्रे फिरवली गेली. पहिला निरोप माजी कृषिमंत्र्यांच्या स्वीय सहायकाला गेला. त्यानंतर विद्यमान राज्यमंत्र्यांच्या सहायकालादेखील फोन गेला. या दोघांचेही आंदोलकांना फोन येऊ लागले. या पीए मंडळींनी  “सांभाळून घ्या. जास्त त्रास देऊ नका. आपली माणसे आहेत,” असे गयावया करून सांगितले. त्यामुळे गुण नियंत्रण विभाग आणि मंत्रालयाचे लागेबांधे उघड झाले. “केतन नावाचा एक मोठा सूत्रधार मंत्रालयातून कायम आमच्या कारवायांमध्ये अडथळा आणतो,” असे अधिकाऱ्यांनीच निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कृषी मंत्रालयात शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे सोडून दलालांच्या लॉबीत सहभागी झालेला हा केतन कोण, असा प्रश्न उपस्थित केला गेला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com