हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास कारवाई 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून परराज्यांतील आंबा हापूस म्हणून विक्री करता येणार नाही, असे जाहीर केले आहे.
Action if other mangoes are sold as hapus
Action if other mangoes are sold as hapus

सांगली ः कर्नाटक आणि इतर राज्यांतून येणारा आंबा हापूस म्हणून राजरोसपणे विक्री केला जात आहे. त्यामुळे मूळ हापूस उत्पादकांचे नुकसान होत असून, ग्राहकांची फसवणूक होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून परराज्यांतील आंबा हापूस म्हणून विक्री करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. हापूस म्हणून परराज्यांतील आंबा विक्री केल्याची तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. मुंबईच्या धर्तीवर सांगली बाजार समितीच्या विष्णूअण्णा फळ मार्केटमध्येही याप्रमाणे अंमलबजावणी गरजेची आहे. 

फळांचा राजा असलेला आंबा बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांनी भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) मिळवला आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांनाच हापूस हा शब्द वापरून आंबा विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. परंतु प्रत्यक्षात बाजारातील चित्र पाहिले, तर कोणताही आंबा हापूस म्हणून विक्री केला जात आहे. हापूस आंबा उत्पादन होण्यापूर्वी देवगड हापूस अशी अक्षरे असलेले पुठ्ठ्याचे लाखो बॉक्‍स छापले आहेत. कर्नाटक आणि इतर राज्यांतील कमी प्रतीचा आंबा या बॉक्‍समध्ये टाकून राजरोसपणे हापूसच्या दराने विक्री केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र दिसून येते. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. 

हापूस म्हणून कर्नाटक व इतर राज्यांतील आंबा विक्री होत असल्यामुळे मूळ हापूस उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. तर ग्राहकांची देखील राजरोस फसवणूक होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार तेथील बाजार समिती आवारातील गाळाधारक, अडते, व्यापारी आदींना ‘हापूस’ आंबा म्हणून इतर राज्यांतील आंबा विक्री करण्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या राज्यातून आंबा येतो, त्या राज्यातील आंब्याच्या जातीच्या नावानेच विक्री करावी. हापूस म्हणून इतर राज्यांचा आंबा विक्री करून ग्राहकांची फसवणूक करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबंधितांवर कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. 

हंगाम सुरू होण्यापूर्वीच पोलिस अधीक्षक तथा सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांना निवेदन पाठवले आहे. देवगड व रत्नागिरी हापूस आंबा म्हणून कमी प्रतीचा आंबा विक्री करून उत्पादक शेतकरी व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. परंतु अद्यापही कोणावर कारवाई केली जात नाही.'  - डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष, ग्राहक पंचायत 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com